प्रोत्साहनपर एक वेतनवाढ द्या, वायसीएमच्या कर्मचार्‍यांची मागणी

प्रोत्साहनपर एक वेतनवाढ द्या, वायसीएमच्या कर्मचार्‍यांची मागणी
 Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय हे कोविड-19 करिता समर्पित केले आहे. येथील सर्व कर्मचारी कोरोना कालावधीत अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे येथील  सर्व कर्मचार्‍यांना प्रोत्साहन म्हणून एक विशेष वेतनवाढ करावी, अशी मागणी वायसीएम रुग्णालयीन कर्मचार्‍यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्या रुग्णांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. महापालिकेचे हे रुग्णालय कोविड-19 करिता समर्पित केले आहे. सध्य स्थितीत परिचारिका, पॅरामेडीकल्स, लिपिक, वॉर्ड बॉय, आया, सफाई कामगार हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. रुग्णालयात काम करताना अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. काही कर्मचारी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर काहींनी आपला जीव देखील गमाविला आहे. याशिवाय परिचारिका व वर्ग चारच्या कर्मचार्‍यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

 त्यामुळे सर्व कर्मचार्‍याचे मनोबल वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर एक विशेष वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी आयुक्त हर्डीकर यांच्यासह महापौर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.