Education News : आरटीई प्रवेशाच्या कागदपत्रांत बदल; प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला १ फेब्रुवारीपासून होणार सुरुवात
Pckhabar- आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशासाठी लागणाच्या आवश्यक कागदत्रांमध्ये शिक्षण संचालनालयाने सुधारणा केल्या आहेत. त्यामध्ये आरटीई प्रवेशासाठी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे बंधनकारक असणार आहे. पूर्वी अनेकजण गॅसबुक, पतसंस्था किंवा स्थानिक बँकेचे पासबुक निवासी पुरावा देण्यासाठी सादर करत होते. मात्र, आता हे पुरावे बाद करण्यात आले असून राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकच ग्राह्य धरले जाणार आहे.
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ नुसार राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येतो. शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केले आहे.
यावर्षी ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. नोंदणी करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत असणार आहे. प्रवेशाची सोडत ८ आणि ९ मार्च रोजी होणार आहे. १० ते ३० मार्च या कालावधीमध्ये संबंधित शाळेकडे कागदपत्रांची पडताळणी आणि तात्पुरता प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर १ एप्रिल ते ९ मे या कालावधीमध्ये चार याद्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. या प्रक्रियेत भाग घेऊन विद्यार्थ्यांचा आरटीईअंतर्गत प्रवेश करण्यासाठी आता राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक लागणार आहे. त्यामुळे निवासी पत्ता दाखवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
आवश्यक कागदपत्रे
■ रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही निवासी पुरावा ग्राह्य असेल. (राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक बंधनकारक)
■ भाड्याने राहत असल्यास
भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
■ भाडेकरार दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत आणि ऑनलाइन अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा.










Leave a Reply