Baramati News : जिजाऊंच्या प्रेरणेतून सामाजिक कार्य करणार : ॲड. सुप्रिया बर्गे
ॲड. सुप्रिया बर्गे यांचा राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मान
Pckhabar-राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आदर्श संस्कार केले. याच संस्कारातून विखुरलेला मराठा समाज व अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे महान आणि ऐतिहासिक कार्य शिवछत्रपतींनी केले. यामागे जिजाऊ माँसाहेबांची प्रेरणा होती. याच प्रेरणेतून आणि आदर्श विचाधारेनुसार या पुढेही सामाजिक कार्य करणार असल्याचे बारामती येथील यशश्री फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅड. सुप्रिया विशाल बर्गे यांनी सांगितले.
वकिली व्यवसायाच्या माध्यमातून केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न पाहता सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या अॅड. सुप्रिया बर्गे यांचा जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला. या पुरस्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष बालाजी जाधव, कोषाध्यक्ष विशाल देवकाते, महिला अध्यक्षा कल्पना काटकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
ॲड. सुप्रिया बर्गे या यशश्री फाऊंडेशनच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी, महिलांचे मालमत्तेत हक्क, महिला संरक्षण व सबलीकरणासाठी, लैंगिक शोषण, अश्या विविध कायदेविषयक प्रश्नांवर चर्चा, तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्याने देऊन त्या महिला मुलींना आपले हक्क आणि कायद्याची माहिती देत असतात. याशिवाय मोटार वाहन अपघात कायदे, वाहतुकीचे नियम, वाहन चालवताना घेण्याची काळजी याबाबतची जनजागृती करण्यासह अपघात घडल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना कोर्टाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देण्यातही त्यांचा कायम पुढाकार असतो.
नि:स्वार्थी सामाजिक कार्याचा गौरव
वकिली व्यवसाय सांभाळून समाजातील प्रत्येक घटकास मदत मिळावी यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर त्यांचा भर असतो. त्याच्या याच नि:स्वार्थी सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.










Leave a Reply