Maharashtra News : लढवय्ये नेते एन. डी. पाटील
एन. डी. पाटील यांच्याविषयी डॉ. अंकुश जाधव यांनी जागवल्या आठवणी
Pckhabar- ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते, रयत शिक्षण संस्था नावारूपाला आणणारे ,महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा सदस्य,महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री श्री. एन. डी पाटील यांचे आज कोल्हापूर येथे निधन झाले.
श्री. पाटील साहेबांचा मुक्काम पूर्वी बऱ्याच वेळा मुंबईतील खार येथे असे.
कै. महिपतराव मोहिते यांच्यामुळे माझा त्यांच्याशी संबंध आला होता. ते स्पष्ट बोलणारे होते. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते श्री.शरद पवार यांची बहीण या एन. डी. पाटील यांच्या पत्नी होत. त्यांना सर्वजण माई म्हणतात. माई मुंबईतील खार येथील शाळेत मुख्याध्यापिका होत्या.
एकदा आम्ही कांदिवलीवरून सांगली जिल्हा रहिवासी पतपेढीच्या मिटिंगला उपस्थित राहून मिटिंग संपल्यावर लोकल ट्रेन ने घरी येत असताना मी त्यांना एक प्रश्न विचारला (मला याची बरेच दिवसापासून उत्सुकता होती). “साहेब ,पवार साहेबांचे आणि तुमचे पक्ष वेगळे, विचारसरणी वेगळी मग तुमचे पटते कसे?” यावर ते म्हणाले” एक तर आम्ही फारसे भेटत नाही, खाजगी घरगुती कार्यक्रमात भेटलो तरी राजकीय विषय काढीत नाही. शरद (ते एकेरी नावाने बोलत, मोठे होते.)ला एकटेपणा हवा असेल, आराम करायचा असेल तेव्हा तो घरी येतो. तेव्हा बरेच वेळा मी घरी नसतो. त्यामुळे जमण्याचा व न जमण्याचा प्रश्न येतच नाही. ज्याने त्याने आपल्या विचाराने काम करावे”
पाटील साहेब किती बुद्धिमान,हुशार होते याची चुणूक माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी ही घेतली होती. ते १९७८-८०च्या श्री.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार मध्ये सहकार मंत्री होते. त्यावेळी कापूस एकाधिकार खरेदी योजने वर खूप चर्चा, वाद सुरू होते. तेव्हा पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी दिल्लीत मिटिंग बोलाविली होती. त्या मिटिंगमध्ये केंद्र सरकारच्या सचिवांनी मांडलेले सर्व मुद्दे पाटील साहेबांनी मुद्देसूदपणे व प्रभावीरित्या खोडून काढले. ते पाहून सर्व सचिव अवाक झाले. त्यांची बोलतीच बंद झाली. मोरारजी देसाई यांच्यावर त्यांचा मोठा प्रभाव पडला व देसाई यांनी त्यांना केंद्रीय मंत्री पदाची ऑफर दिली. अर्थात पाटील साहेबांनी ती स्वीकारली नाही.
महाराष्ट्रात खाजगी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये यांचे पेव फुटले होते. तेव्हा मी एकदा सहज म्हणालो होतो. रयत शिक्षण संस्थेने अशी महाविद्यालये काढावीत. त्याला त्यांनी विरोध करून ते म्हणाले”रयत ही बहुजनांच्या साठीच कार्यरत राहील”.
गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी “कमवा व शिका” ही योजना जोरदार पणे राबवली. असा नेता पुन्हा होणे नाही. विचारी, सुसंस्कृत, प्रतिस्पर्धीशी सुद्धा सभ्य भाषेत बोलणारे, खऱ्या अर्थाने समाजाशी एकरूप असणारे नेते आता काळाच्या पडद्याआड झाले आहेत.
डॉ.अंकुश जाधव










Leave a Reply