Pimpri News : शहरातील कंपन्या, हाउसिंग सोसायट्यांचे फायर ‘मॉकड्रील’ करा

Pimpri News : शहरातील कंपन्या, हाउसिंग सोसायट्यांचे फायर ‘मॉकड्रील’ करा


महापालिकेकडे भाजपाची मागणी
Pckhabar-शहरात आगीच्या घटना घडत आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागावर मोठा ताण येत आहे. तसेच आगीच्या घटनांमध्ये जिवीत व वित्तहानी होते. हे नुकसान भरून येत नाही. त्यामुळे शहरातील हाउसिंग सोसायटी व विविध आस्थापनांमध्ये ‘मॉकड्रील’ करून आग नियंत्रणात आणण्यासाठीची प्रात्याक्षिके सादर करावीत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे करण्यात आली आहे.

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी याबाबत महापालिका आयुक्तांकडे निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, शहरात मोठ्या संख्येने बहुमजली इमारती आहेत. तसेच कंपन्या देखील आहेत. यातील बहुतांश ठिकाणी आग प्रतिबंधक किंवा अग्निशामक यंत्रणा नाही. काही ठिकाणी ही यंत्रण अद्ययावत नाही. त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रण कुचकामी ठरते तर काही प्रसंगांमध्ये यंत्रणा कार्यान्वित होत नाही. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होत नाही. यात मोठे नुकसान होते. शहराच्या प्रदूषणतही भर पडते. अशा घटनांमुळे महापालिकेच्या अग्निशामक विभागावर मोठा ताण येतो.

महापालिका हद्दीत बहुमजली इमारतींच्या बांधकामांना परवानगी देण्यात येत आहे. तसेच जुन्या इमारती देखील मोठ्या संख्येने आहेत. अशा इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा नाहीत. अशा इमारतींमध्ये आगीची घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिकांना त्याबाबत माहिती दिली पाहिजे. आगीच्या घटना टाळण्यासाठी जनजागृती करून आगीवर नियंत्रण कसे मिळवावे याची प्रात्यक्षिके सादर करण्यात यावीत. तसेच खासगी, शासकीय, महापालिकेच्या आस्थापना व हाउसिंग सोसायटी यांच्याकडील अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित तसेच अद्ययावत करण्यात यावी. त्यासाठी हाउसिंग सोसायट्यांचे फेडरेशन तसेच इतर काही स्वयंसेवी संस्था आदींचे त्यासाठी सहकार्य घेता येईल. जेणेकरून आगीच्या घटना टाळण्यास आणि कमी होण्यास मदत होईल.

शहरातील शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. तेथील विद्यार्थ्यांना देखील आग नियंत्रणात आणण्याबाबत माहिती देण्यात यावी. विविध स्पर्धा, नाटिका, आदींचे आयोजन करण्यात यावे. शहरातील चौक, मुख्य रस्ते, बाजारपेठ आदी ठिकाणी जनजागृती करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.