Pimpri News : कवी अरूण बोऱ्हाडे यांच्या ‘चांदण्यांच्या अंगणात’ काव्यसंग्रहाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन

Pimpri News : कवी अरूण बो-हाडे यांच्या ‘चांदण्यांच्या अंगणात’ काव्यसंग्रहाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन


Pckhabar- कामगार नेता असला तरी अरुण बो-हाडे हे मुलता: कवी आहेत. त्यांच्याजवळ प्रयत्न, चिकाटी आणि उत्स्फूर्त अशी काव्यलेखन शैली आहे. सार्वजनिक क्षेत्रात दिर्घकाळ कार्यरत असताना आपल्या आजूबाजूच्या ब-यावाईट अनुभवांतूनही मनाची संवेदनशीलता टिकवून ठेवली आहे. त्यांच्या लेखनात सृष्टीविषयीचे प्रेम, माणसाविषयीची आस्था आणि श्रध्दाभावही आहे. मुल्य-हासाची जाणीव त्यांना उदास करणारी वाटते तरीहि मानवता जपत, आदर्शांची पूजा करत उभं राहण्याची जिद्द या कवी मनाच्या कामगार नेत्यात आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवीयत्री डॉ. अरुणा ढेरे यांनी केले.

कवी अरूण बो-हाडे यांच्या ‘चांदण्यांच्या अंगणात’ या काव्यसंग्रहाचे डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन बुधवारी डॉ. अरुणा ढेरे यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी अरुण बो-हाडे, ज्येष्ठ साहित्यिक व कथालेखक बबन पोतदार, साहित्यिक राज अहिरराव, ज्येष्ठ कवी दादाभाऊ गावडे आणि संपादक संदीप तापकीर हे उपस्थित होते.

यावेळी डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की, कवितेची वाट सोपी नसते. भाव भावना, विचार कितीही मौलिक असले तरी त्यांना काव्यरुप देणं ही अवघड असते. अरुण बो-हाडे यांच्याजवळ मात्र उत्स्फूर्त अशी काव्यलेखन शैली आहे. कवितेवर त्यांचे नितांत प्रेम आहे. यातूनच त्यांचा ‘चांदण्यांच्या अंगणात’ हा चौथा काव्यसंग्रह आकारास आला आहे. असेही भावोत्कट उद्‌गार ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी काढले.

‘माणसाच्या अंत:करणात भक्ती असली की आयुष्याचा देव्हारा कधीच मोकळा राहत नाही. अरुण बो-हाडे यांची अगोदर समाजावर भक्ती होती. त्यामुळे शब्दांवर भक्ती आली. त्या कारणाने इच्छाशक्ती जागी झाली. त्या चैतन्यभूमीवर काव्यसंग्रह रुपी वृक्ष बहरला’ असे यावेळी राज अहिरराव यांनी शुभेच्छा देताना सांगितले.