IPL News : दिल्ली कॅपिटल्सचे प्ले ऑफमध्ये टेक ऑफ !

IPL News : दिल्ली कॅपिटल्सचे प्ले ऑफमध्ये टेक ऑफ !
मुंबईची प्लेऑफची शर्यत कठीण

Pckhabar- इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात आज (शनिवार)  पहिल्या  सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्स विजय मिळवत टेक ऑफ केले आहे. या पराभवामुळे मुंबईसाठी प्लेऑफची शर्यत आणखी कठीण झाली आहे.

या सामन्यात मुंबईने २० षटकांत ८ बाद १२९ धावा करत दिल्लीसमोर विजयासाठी १३० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग दिल्लीने १९.१ षटकात ६ विकेट्स गमावत १३२ धावा करत पूर्ण केला.

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजीसाठी उतरले. पण, हे दोघे फार काळ टिकू शकले नाहीत. शिखर दुसऱ्या षटकात ८ धावांवर धावबाद झाला. तर तिसऱ्या षटकात कृणाल पंड्याने पृथ्वी शॉला ६ धावांवर पायचीत केले. ५ व्या षटकात स्टिव्ह स्मिथही ९ व्या षटकात त्रिफळाचीत झाला. त्याला नॅथन कुल्टर नाईलने बाद केले. यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पंत खेळपट्टीवर स्थिरावला असताना जयंत यादवच्या गोलंदाजीवर ९ व्या षटकात २६ धावांवर हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले.

यानंतर अक्षर पटेलने श्रेयस अय्यरची साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ट्रेंट बोल्टने १२ व्या षटकात ९ धावांवर पायचीत केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शिमरॉन हेटमायरने आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो ८ चेंंडूत १५ धावांवर असताना जसप्रीत बूमराहने त्याला रोहित शर्माकरवी झेलबाद केले.

अखेर श्रेयस अय्यरने आर अश्विनला साथीला घेत संघाला विजयापर्यंत पोहचवले. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी ४ धावांची गरज असताना अश्विनने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि दिल्लीने विजयावर शिक्कामोर्तब केले. यावेळी श्रेयस अय्यरने संयमी पण महत्त्वपूर्ण ३३ धावांची नाबाद खेळी केली. अश्विनने नाबाद २० धावा केल्या.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने सलामीला फलंदाजी केली. पण हे दोघे चांगली सुरुवात देण्यास अपयशी ठरले. मुंबई ८ बाद १२९ धावांपर्यंत मजल मारू शकली.