Crime News : पैसे दामदुप्पट करून देण्याच्या अमिषाने सात जणांची 52 लाखांची फसवणूक

Crime News : पैसे दामदुप्पट करून देण्याच्या अमिषाने सात जणांची 52 लाखांची फसवणूक
Pckhabar- एक वर्षांत दाम दुप्पट पैसे देण्याचे अमिष दाखवून सहा जणांच्या एका टोळीने सात जणांना तब्बल 52 लाख 32 हजारांचा चुना लावला आहे. ही धक्कादायक घटना आळंदी परिसरात उघडकीस आली आहे.

रेश्मा लहु गोरे (वय-34, रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार स्मिता सखाराम परब (रा. आनंद मंगल कार्यालयामागे, दत्त मंदिर रस्ता आळंदी), अनिल वामन भेरे (रा. कोपरीगाव, ठाणे), सुभाष रामचंद्र मांडवलकर (रा. टिटवाळा,कल्याण), श्रीमती विनया धर्मेश गोसर (रा. मानपाडा रोड, डोंबविली), भरत क्षेत्रे (रा. पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ओसम आवर अपॉर्च्युनिटी प्रा. लि. या नावाच्या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीचे मुख्य कार्यालय बावधन येथे होते. आरोपी हे या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. आरोपींनी फिर्यादी व काही नागरिकांना एका वर्षांत दामदुप्पट पैसे देण्याचे अमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी त्यांचे आणि नातेवाईकांचे असा 24 लाख 41 हजार 220 रूपये, सरिता गणेश बहिरट यांनी 6 लाख 50 हजार, शालन नितीन पळसकर यांनी 9 लाख 15 हजार, रेखा सिताराम वैद्य यांनी 6 लाख 25 हजार 780, कुणाल नितीन पळसकर यांनी 3 लाख तर  केशव आसाराम पवार, अनिल विजय नरके,  श्रीमती अपर्णा बाळकृष्ण जाधव  यांचे प्रत्येकी 1 लाख असे 52 लाख 32 हजार रूपये घेतले. मात्र, त्यांची मुळ रक्कम किंवा दामदुप्पट पैसे न देता या सर्वांची आर्थिक फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. एस. गायकवाड अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *