Pimpri Crime News :  दिवसा बंद घराची टेहाळणी, रात्री घरफोडी करणार्‍या दोन सख्या भावांना अटक

ही बातमी शेअर करा.

Pimpri Crime News :  दिवसा बंद घराची टेहाळणी, रात्री घरफोडी करणार्‍या दोन सख्या भावांना अटक
18 लाखांचा ऐवज जप्त
Pckhabar-स्पोटर्स बाईक आणि महागडे कपडे घेण्याची हौस पूर्ण करण्यासाठी दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री घरफोडी करणार्‍या एका टोळीतील दोन सख्या भावांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-4 च्या पथकाने अटक केली आहे. तसेच घरफोडीतील सोने खरेदी करणार्‍या एका सोनाराही अटक केली आहे. आरोपींकडून 48 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 18 लाख 30 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

साहील रमेश नानावत उर्फ अल्लु अर्जुन (वय-25), देवदास उर्फ  दास रमेश नानावत (वय-23, दोघेही रा. पाथरगाव, मावळ) आणि सोनार  योगेश नुर सिंह (वय-34, रा. पौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सुरदेव नानावत (रा. घोटावडे, ता. मुळशी, पुणे), ध्यान केसरिया राजपुत (रा. नांदे, ता. मुळशी, पुणे), अजय सरजा नानावत, राम बिरावत (दोघेही रा. पौड, जि. पुणे) हे फरार आहेत.

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक अंबरिश देशमुख आणि पोलीस अंमलदार प्रशांत सैद घरफोडीच्या घटनांप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज गोळा करत होते. घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहा जणांची टोळी असल्याचे समोर आले. घऱफोडीतील दोन सख्ये भाऊ दौंड तालुक्यातील एका नातेवाईकांच्या घरी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साहील आणि देवदासला ताब्यात घेतले. आरोपींकडे तपास केल्यानंतर घरफोडीतील सोने खरेदी करणार्‍यांना पौंड येथील नाकोडा ज्वेलर्सच्या योगेश सिंहलाही पोलिसांनी अटक केली.

आरोपींचा पौड व मावळ परिसरातील जंगताल डोंगर पायथ्याशी अवैध गावठी हातभट्टीची दारू तयार करून विकण्याचा धंद्दा आहे. स्पोटर्स बाईक आणि महागडे कपडे घेण्यासाठी आरोपी दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री घरफोडी करत होते. या टोळीने गेल्या तीन वर्षांत पिंपरी-चिंचवड आणि  पुणे ग्रामीण परिसरात 48 गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींकडून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 दुचाकी, गॅस सिलेंडर, होमथिएटर, बॅटर्‍या, कुलर, मोबाईल असा 18 लाख 30 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट -4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिश देशमुख, सिध्दनाथ बाबर, धर्मराज आवटे, दादा पवार आदींच्या पथकाने केली आहे.


ही बातमी शेअर करा.