Pimpri News : कोरोनामुळे गेल्यावर्षी बक्षीस योजनेपासून वंचित राहिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावर्षी लाभ द्या

ही बातमी शेअर करा.

Pimpri News : कोरोनामुळे गेल्यावर्षी बक्षीस योजनेपासून वंचित राहिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावर्षी लाभ द्या

उपमहापौर हिराबाई घुले यांची प्रशासनाला सूचना

Pckhabar- कोरोनामुळे मागीलवर्षी दहावी आणि बारावीचे काही गुणवंत विद्यार्थी महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील इतर कल्याणकारी योजने अंतर्गंतच्या बक्षीस योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत. काहीजण आपल्या मूळगावी होते. तर, अनेकांना कोरोनामुळे अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे मागीलवर्षी बक्षीस योजनेचा लाभ घेऊ न शकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यावर्षी लाभ द्यावा. यासाठी निधीची तरतूद कमी पडत असेल. तर, त्यात वाढ करावी. एकही गुणवंत विद्यार्थी बक्षीस योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने महापालिकेने 2013 पासून बक्षीस योजना सुरु केली आहे. त्यानुसार महापालिकेतर्फे 80 टक्यांहून अधिक गुण घेणा-या विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सत्कार केला जातो. मागीलवर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा चालू असतानाच्या काळात 10 मार्च 2020 रोजी शहरात राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. पहिली लाट नोव्हेंबर 2020 पर्यंत होती.

लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने उदरनिर्वाहासाठी शहरात आलेले अनेक नागरिक कुटुंबासह आपल्या मूळगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या दहावी, बारावीतील गुणवंत मुलांना पालिकेच्या बक्षीस योजनेसाठी अर्ज करता आला नाही. तसेच कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक विद्यार्थी अर्ज करू शकले नाहीत. त्यांना बक्षीस योजनेचा लाभ मिळाला नाही. मागीलवर्षी बक्षीस योजनेपासून वंचित राहिलेले विद्यार्थी, पालकांनी नुकतीच माझी भेट घेतली.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गोरगरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले आहे. मागील पावणे दोन वर्षांपासून सर्वजण कोरोना महामारीला सामोरे जात आहोत. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कोरोनाच्या परिस्थितीमुळे मागीलवर्षी लाभापासून वंचित राहिलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना यंदा लाभ द्यावा. यासाठी निधीची तरतूद कमी पडत असेल. तर, त्यात वाढ करावी. त्याकरिता कोणाचीही हरकत राहणार नाही. बक्षीस योजनेच्या लाभामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी थोडीफार मदत होईल, हातभार लागेल, असे उपमहापौर घुले यांनी निवेदनात म्हटले आहे.

 


ही बातमी शेअर करा.