Chinchwad News : आषाढीनिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये बाल वारकऱ्यांनी अनुभवली पंढरीची वारी

Chinchwad News : आषाढीनिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये बाल वारकऱ्यांनी अनुभवली पंढरीची वारी

Pckhabar-आषाढी एकादशीनिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात टाळ, मृदुंग, ढोल, ताशांचा गजर व विठुरायाच्या नामघोषात बाल वारकरी तल्लीन झाले होते. ‘जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी ! या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे या छोट्या वारकऱ्यांनी शाळेमध्ये जणू पंढरीच निर्माण केली होती. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, भक्तिगीते, हरिपाठ, अभंग सादर केले.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीची प्रतिकृती तयार करीत नृत्य, पारंपरिक फुगडया, रिंगण यांचे हुबेहुब दर्शन घडविले. बाल वारकऱ्यांसोबत या वारीत संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर प्राथमिक स्कुलच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, लिटल फ्लॉवर माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षिका ज्योती मोरे, निलम मेमाणे, प्रीती पितळे, मनिषा पुराणिक, नीलम सावंत, भटू शिंदे, उदय फडतरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ‘पाऊले चालती.. पंढरीची वाट’, असे म्हणत वारीचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा केलेली होती. अनेक बालचमूंनी संतांच्या वेशभूषा परिधान करून दिंडीची शोभा वाढवली. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहत होता.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी सांगितले, की सर्व मतभेद विसरून आपुलकीने एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजे वारी. तर संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही म्हणून कोणताच अहंकार अंगी बाळगू नका, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *