Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात संपन्न

Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात संपन्न
Pckhabar- श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम जल्लोषात पार पाडला.

कार्यक्रमासाठी सृजन फाऊंडेशनचे संचालक सौरभ कंद व सौ. मानसी कंद, शाळेच्या उपप्राचार्या सौ. शैलजा स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सौरभ कंद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. स्वराज्य उभारणीत मावळ्यांचे योगदान किती महत्त्वाचे होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने वर्षभरात शिवाजी महाराजांवरील किमान एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, असे विद्यार्थ्यांंना आवाहन केले.

इ. सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवमय वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जान्हवी गंधाडे हिने आपल्या मनोगतातून शिवरायांची भूमिका प्रभावीपणे मांडली. काही विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून शिवचरित्र साकारले, तर ‘आले मराठे’ या गीतावर विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण नृत्य सादर केले. आरोही मारणे व सहकाऱ्यांनी पराक्रमाचा पोवाडा सादर करत महाराजांच्या कार्याचा गौरव केला. अथर्व फटांगडे व त्याच्या सहकाऱ्यांनी ‘माझा शिवबा छत्रपती झाला गं…’ या गीतातून आनंद व्यक्त केला. अथर्व फटांगडे याने दिलेल्या दमदार शिवगर्जनेने वातावरण शिवमय झाले होते.

या कार्यक्रमास इयत्ता तिसरी ते सातवीतील विद्यार्थी, शिक्षकवृंद व सृजन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवनी पाटील हिने केले, तर कार्तिक भोसले याने आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *