Anti corruption Raid :भंगार दुकानदाराकडून 1 लाखाची लाच घेताना ग्रामपंचायत सदस्याला रंगेहाथ पकडले
मावळमध्ये एकच खळबळ


Pckhabar-मावळ तालुक्यातील साते गावात भंगार दुकानदाराकडून ना हरकत परवान्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामपंचायत सदस्याला रंगेहाथ पकडले. मात्र, सरपंच पसार झाला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी साते गावच्या परिसरात करण्यात आली.

ऋषीनाथ आगळमे असे अटक केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. दोघांविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने साते गावात भंगाराचे दुकान टाकले होते. त्याच्याविरुद्ध ग्रामपंचायतीत तक्रार केली. तेव्हा सरपंचाने या तक्रारदाराला बोलावून दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही. तेव्हा तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीकडे ना हरकत परवान्यासाठी अर्ज केला. तेव्हा सरपंचाने ना हरकत परवान्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. त्यावर तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करताना ऋषीनाथ आगळमे हा ग्रामपंचायत सदस्य लाचेची रक्कम घेण्यासाठी आला. तेव्हा तक्रारदाराकडून 1 लाख रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याची कुणकुण लागताच सरपंच पसार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिक तपास करत आहेत.











Leave a Reply