Dehu News : आईच्या संस्कारांची ज्योत समाजसेवेतून तेवत ठेवणे हीच खरी श्रद्धांजली -हभप गणेश महाराज भगत

Dehu News : आईच्या संस्कारांची ज्योत समाजसेवेतून तेवत ठेवणे हीच खरी श्रद्धांजली -हभप गणेश महाराज भगत

*वै. सौ. जनाबाई हगवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रवचन सेवा व गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप*
Pckhabar- आईचे प्रेम, तिचे संस्कार आणि तिची माया ही ईश्वराने दिलेली अनमोल देणगी असते. आईच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने अभिवादन करायचे असेल, तर तिच्या संस्कारांची ज्योत समाजसेवेच्या माध्यमातून तेवत ठेवणे, यापेक्षा सुंदर श्रद्धांजली दुसरी कोणती असू शकते असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, कैवल्य गुरुकुल चे संस्थापक, अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज भगत यानी केले.

आदर्श माता वै. सौ. जनाबाई रामचंद्र हगवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कैवल्य गुरुकुल संस्थेचे संस्थापक ह. भ. प. गणेश महाराज भगत यांची प्रवचन सेवा संपन्न झाली. यावेळी संतविचारांचा संदर्भ घेत तसेच विविध हृदयस्पर्शी दृष्टांतांच्या माध्यमातून त्यांनी आईच्या प्रेमाची, त्यागाची आणि संस्कारांची महती आपल्या सहज, प्रासादिक व ओजस्वी वाणीतून अत्यंत सुंदर पद्धतीने उलगडून सांगितली.

आई ही केवळ जन्म देणारी नसून, ती आपल्या जीवनाची पहिली गुरू, संस्कारांची शिदोरी देणारी आणि ईश्वरभक्तीची वाट दाखविणारी शक्ती आहे. संतांच्या विचारांतून आईच्या ममतेचे व त्यागाचे महत्त्व विशद करताना महाराजांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.

याच पवित्र प्रसंगी वै. सौ. जनाबाई हगवणे यांचे सुपुत्र कामगार नेते श्री. मछिंद्र हगवणे व परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू येथील गरजू व गुणवंत विद्यार्थिनींना सायकली भेट देण्यात आल्या.
शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, विद्यार्थिनींना ज्ञानाच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जाता यावे आणि त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळावी, या उदात्त भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम सेवेतून संस्कार आणि संस्कारातून समाजनिर्मितीचा सुंदर संदेश देणारा ठरला.

वै. सौ. जनाबाई रामचंद्र हगवणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त करण्यात आलेली ही सेवा त्यांच्या प्रेमळ, संस्कारमय आणि सेवाभावी जीवनाला वाहिलेली कृतज्ञता व श्रद्धेची भावपूर्ण आदरांजली ठरली. श्रीक्षेत्र देहू येथिल सरस्वती मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या पुण्यस्मरणाचा कार्यक्रमाला हगवणे परिवाराचे आप्तेष्ट, नातेवाईक व देहू ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *