देवाभाऊ, बळीराजाच्यासाठी ढुंकवून बघायला तयार नाहीत – ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

देवाभाऊ, बळीराजाच्यासाठी ढुंकवून बघायला तयार नाहीत – ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल Pckhabar- संपूर्ण कर्जमाफी, ओला दुष्काळ, पीकविमा, हमीभाव, खतांच्या वाढलेल्या किमती, रोगांचा प्रादुर्भाव, रानटी जनावरांचा हैदोस अशा विविधं प्रश्नांवर असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी नाशिकमध्ये आयोजित ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’त सहभागी झालो व उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या काळ्या आईशी इमान राखणारा आज तुमचा आणि माझा भाऊ- बहीण अस्वस्थ आहे. कधी दुष्काळ, यंदाच्या वर्षी अतिवृष्टी! बीडसारखा जिल्हा, जिथे अनेकदा दुष्काळ असतो. आज त्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोकांच्या शेतीचं नुकसान झालं. एकट्या बीडला नाही, महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाली. त्याचा परिणाम शेतीवर झाला, शेतकरी अस्वस्थ आहे. संकटं येतात, त्या संकटातून मार्ग काढायचा असतो. तो मार्ग काढायचा ती जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार यांची असते. आपण बघतो आहोत संकट आहे, शेतकरी आत्महत्या करतोय. पण त्याच्याकडे ढुंकवून बघायला आजचे राज्यकर्ते तयार नाहीत. त्यामुळेच पुन्हा एकदा आत्महत्येचं सत्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्या विदर्भातल्या आहेत, मराठवाड्यातल्या आहेत. जीव का देतो माणूस? शेतकरी जीव देतो, फास गळ्यात टाकतो. कशामुळे एवढी टोकाची भूमिका तो घेतो? त्याचं महत्त्वाचं कारण त्याच्या संकटाच्या काळात राज्यकर्ते त्याच्यामागं उभे राहत नाहीत. त्यामुळे “स्वतःचं जे काही असेल अथवा नसेल, ते सर्वस्व जात असेल त्यापेक्षा जीव दिलेला बरा!” हा विचार आज शेतकरी करतोय. त्यामुळेच आत्महत्या पुन्हा एकदा वाढायला लागल्या. नाशिकचा कांदा जगात जातो, दोन पैसे मिळवतो. शेतकऱ्यांची इच्छा असते की, कांद्याचं पीक चांगलं आलं, दोन पैसे मिळाले तर उद्या मुलीचं लग्न करीन. म्हातारपणची सोय करीन, मुलाच्या शिक्षणाची सोय करीन. पण आज काय दिसतंय चित्र? आज कांद्याला किंमत नाही. कांदा निर्यात केला, त्याच्यामध्ये किंमत वाढेल. तर केंद्र सरकारने निर्यातीला बंदी केली. तुम्ही किंमत देत नाही, तुम्ही बाहेर विकून देत नाही. करायचं काय शेतकऱ्यांनी? त्याचा परिणाम आज कांदा उत्पादक आज संकटात आहे. तीच गोष्ट सोयाबीनची! आणि तीच गोष्ट इतर शेतीची! ज्यांच्या राज्य हातात आहे, त्या राज्यकर्त्यांना शेतकऱ्याचं हे दुखणं समजत नाही. ते समजत नाही म्हणून आपण बघ्याची भूमिका नुसती घेत बसलो तर, आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तो आकडा लाखात झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला उत्तर शोधायचं असेल तर, या सरकारवर एक प्रकारचं दडपण आणलं पाहिजे. देवाभाऊ, सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही तुमचे फोटो लावले. शिवाजी महाराजांचं दर्शन घेत आहात, हे तुम्ही देशामध्ये दाखवलं. शिवछत्रपती एक वेगळे राजे होते. त्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याच्याकडं नांगराचीही व्यवस्था नव्हती. महाराजांनी काय करावं? शिवाजी महाराजांनी नांगराचा फाळ हा बसवण्यासाठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोन्याच्या फाळाने त्यांनी शेतीची नांगरणी केली आणि हे सांगितलं की, हा बळीराजा हा उपाशी राहिला तर देश उध्वस्त होईल. हा आदर्श शिवाजी महाराजांचा आज देवाभाऊ घेतील, असं आम्हाला वाटत होतं. पण ठिकठिकाणी मोठीमोठी होर्डिंग, मोठेमोठे पोस्टर्स, मोठीमोठी चित्र ही त्यांनी लावली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन! पण त्या बळीराजाच्यासाठी ढुंकवून बघायला तयार नाहीत. असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल. आम्ही सत्तेचा गैरवापर करत नाही. पण सरकार, सत्ता हातात असून दुर्लक्ष करत असेल तर बघ्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही. ते करायचं असेल तर आत्ताच शशिकांत शिंदे, जयंतराव या सगळ्यांनी सांगितलं की, येत्या ठराविक दिवसांमध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाहीत, शेतकऱ्यांना मदत केली नाही तर, आज नाशिकचा हा मोर्चा ही सुरुवात आहे. ही सुरुवात इथेच थांबणार नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तर, हा मोर्चा आणखी मोठा आणि उग्र स्वरूपात निघेल, हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. देवाभाऊंना माझी विनंती आहे, आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतंय ते. नेपाळमध्ये गेल्या आठ दिवसांत काय घडलं? राज्यकर्ते गेले, एक भगिनी आली. तिच्या हातात राज्य दिलं गेलं. आणखी काय झालं? मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. शहाणपणा हा शिकण्याचं काम देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी करतील, अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी करतो. या मोर्चासाठी तुम्ही आलात, या मोर्चाच्या तयारीसाठी मग रोहित पवार असतील. या मोर्चाच्या तयारीसाठी गेले काही दिवस आमचे सहकारी भुसारा हे असतील. नाशिक शहर आणि जिल्ह्यातले सर्व प्रमुख नेते असतील. त्यांनी जे कष्ट घेतले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळेजण सुद्धा एवढ्या संख्येने आलात, मोर्चात सहभागी झालात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक करतो. पुन्हा महिना दीड महिन्यात जर घडलं नाही तर तयार राहण्याचे आदेश पवार यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *