Dehu News : नामस्मरणाने भावबंध तुटून उद्धार होतो- हभप जयवंत महाराज बोधले

Dehu News : नामस्मरणाने भावबंध तुटून उद्धार होतो- हभप जयवंत महाराज बोधले

Pckhabar- संपूर्ण संसारात एकच सत्य खरे असून, साच असून ते आहे श्री हरि विठ्ठलाचे नाम, जे घेतल्याने मग मनुष्याचे येथील भावबंध तुटतात, मायेपासून त्याची सुटका होते आणि अंती त्याचा उद्धार होतो. विठ्ठलाचे नाम गायल्याने त्याची उभयालोकांत, म्हणजेच ह्या तिन्ही लोकांत कीर्ती देखील होते. परंतु त्यासाठी ठायी भाव मात्र शुद्ध हवा. शुद्ध भाव असतो त्यास हा लाभ उठाउठी किंवा तात्काळ लाभतो. त्याला त्याची प्रचिती हातोहात येते. नामस्मरण करणारा जरी कितीही भोळा असला तरीही त्याचा भाव मात्र उच्चप्रतीचा असल्याने तो काळाला देखील जिंकू शकतो, त्याला काळाला जिंकण्याचे तंत्र चांगलेच अवगत होते असे प्रतिपादन हभप जयवंत महाराज बोधले यांनी केले.

श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात हभप जयवंत महाराज बोधले यांची
सत्य साच खरे । नाम विठोबाचे बरे ॥
येणे तुटती बंधने । उभयलोकी कीर्ती जेणे ॥
भाव ज्याचे गाठी । त्यासी लाभ उठाउठी ॥
तुका म्हणे भोळा । जिंकू जाणे कळीकाळा ॥

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तनसेवा करीत बोधले महाराजांनी भगवंताच्या नामाचे स्वरूप, भगवंताच्या नामाचे परिणाम, भगवंताच्या नामाची अनुभूती व भगवंताचे नामस्मरण करणा-याचे सामर्थ सांगितले. ज्या भूमीला तुकोबारायाचे पाय लागले, ज्या जागेवर साक्षात भगवंत परमात्मा पांडुरंगाचे प्राकट्य झाले, ज्या जागेवर संत तुकाराम महाराजांनी भगवंताची नामसाधना केली अशा अनेक अनुभूतींनी बहरलेला पवित्र असा हा भंडारा डोंगर आहे. अनेक वेगवेगळ्या अनुभूती येथे अंत:करणाला स्पर्श करून जातात. श्री क्षेत्र भंडारा डोंगर ही अनुष्ठान भूमी आहे कारण येथे भगवंताचे अधिष्ठान आहे. अनुस्पर्श, अनुष्ठान, अधिष्ठान हे स्पर्श भंडारा डोंगरावर येतात. मुखी नाम हाती मोक्ष | ऐसी साक्ष बहुतांसी || तुकोबारायांच्या या अभंगाचे प्रमाण देत नाम स्मरणाच्या साधनेने सगुणाकडून निर्गुणाकडे जाता येते.

अवघ्या ५० ते ६० वर्षांची वाटचाल असणारी काही संप्रदाय जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले परंतु ८०० वर्षांची थोर परंपरा असून देखील आमच्या वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आपण महाराष्ट्राच्या बाहेर घेवून जावू शकलो नाही ही आमची फार मोठी शोकांतिका आहे, खंत आहे. परंतु आता श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर आयोध्येतील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराप्रमाणेच भव्य-दिव्य असे मंदिर उभे राहत आहे याचा आनंद आहे. वारकरी संप्रदायावर, तुकोबारायांवर निष्ठा, श्रद्धा असणाऱ्या सर्व वारकरी भाविकांच्या, सर्व सामान्य देणगीदारांच्या माध्यमातून हे मंदिर निर्माणाचे कार्य सुरु आहे. लवकरात लवकर हे मंदिराचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार, प्रवचनकार महाराज मंडळींनी देखील आपला सहभाग देऊन या मंदिर निर्माण कार्याला मोठ्या स्वरुपात सहकार्य केले पाहिजे अशी भावना बोधले महाराजांनी व्यक्त केली.

काकडा आरती, श्री विठ्ठल-रूक्मिणी, संत तुकाराम महाराजांना अभिषेक करून महापूजा संपन्न झाली. सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात हभप नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने अवीट, रसाळ वाणीतून गाथा पारायण दोन सत्रात संपन्न झाले. सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान ‘संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’ हा हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित चिंतनाचा कार्यक्रम झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *