Dehu News : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रंगला रिंगण सोहळा
मृदंगाच्या ठेक्यावर ताल धरत विद्यार्थ्यांनी फुगड्यांचा आनंद लुटला
शिक्षकवृंद पारंपारिक वेशभूषेत
Pckhabar – श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी व रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील संतपरंपरा तसेच देहूतील जगद्गुरु संत तुकोबारायांच्या वारीचा वारसा पुढील पिढीला प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरावा म्हणूनच पालखीचा सोहळा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.
चिमुकल्या वारकऱ्यांनी आपल्या लाडक्या विठूरायाची आळवणी करत हे शैक्षणिक वर्ष यशस्वीरित्या पार पाडण्याचे व विश्वशांतीचे मागणे मागितले. शाळेच्या प्रवेशद्वारातून पालखीचे विठूरायाच्या नामघोषात स्वागत करण्यात आले. चिमुकल्या वारकऱ्यांनी पालखीचे दर्शन घेत विठ्ठलाशी आपली भक्तिमय नाळ जोडली. याच भक्तिमय वातावरण इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनींनी ‘माऊली-माऊली’ या गाण्यावर टाळांचा नाद करत विठ्ठलाच्या दर्शनाची आस पूर्ण केली. तर इयत्ता चौथीतील विद्यार्थी भक्तीच्या सावळ्या रंगाने रिंगण सोहळ्यात तल्लीन झाले. या रिंगण सोहळ्यात वारकरी संप्रदायाचा झेंडा फिरवत वारकऱ्यांच्या विशेष फुगडीने उपस्थितांची दाद मिळवली.
इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी आपले रिंगण करत मृदंगाच्या ठेक्यावर ताल धरत फुगड्यांचा आनंद लुटला. इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थी वारकऱ्याच्या वेशभूषेत या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व श्री पांडुरंगाच्या आरतीने या रिंगण सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षकवृंद पारंपारिक वेशभूषेत या रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते.











Leave a Reply