Dehu News : वारकरी संप्रदाय हा माणसांमध्ये परमेश्वर पहायला शिकवितो : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Dehu News : वारकरी संप्रदाय हा माणसांमध्ये परमेश्वर पहायला शिकवितो : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
‘आनंदडोह’ चा पहिला प्रयोग अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

अनेक मान्यवरांची उपस्थिती
Pckhabar – पालखी सोहळ्यादरम्यान आरोग्यवारी आणि आनंदवारी यांची सांगड घालत माणसांमध्ये परमेश्वर पहायला शिकविणारा वारकरी संप्रदायाचा विचार वर्षानुवर्षे चालू राहणार आहे, असे मत मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी (दि.9) व्यक्त केले.

संवाद, पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नाट्य चित्रपट अभिनेते योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ हा एकपात्री नाट्यप्रयोग विविध ठिकाणी सादर होणार असून वारीतील शुभारंभचा प्रयोग श्रीक्षेत्र देहू येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘आनंदडोह’ या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मा. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. वारीच्या मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्यवारी तसेच संत तुकारामांचा जीवनपट उलगडणारे ‘आनंदडोह-आनंदवारी’ या अनोख्या उपक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. आजपर्यंत शासनाकडून ११ हजार कोटी रुपयांचा निधी पालखी मार्गासाठी उपलब्ध करून दिला, असेही ते म्हणाले. यावर्षी देखील वारकऱ्यांना रेनकोट, राहण्यासाठी तंबू, प्रवासात उपयोगाला येणारी बॅग अशा साहित्याचे वाटप करुन पालखीची जय्यत तयारी झाल्याचे त्यांनी जाहीर केले.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत साहित्याचे गाढे अभ्यासक व घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी भूषविले. माजी राज्यमंत्री मा. संजय भेगडे, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, देहूच्या नगराध्यक्षा सौ. स्मिता चव्हाण, विश्वस्त हभप माणिकमहाराज मोरे, प्रमुख संयोजक संवाद, पुणेचे अध्यक्ष श्री. सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार श्री. राजेश पांडे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद आणि शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देहू ते पंढरपूर या आरोग्यवारीचे उद्घाटन करण्यात आले. या आरोग्यवारी मार्फत वारकऱ्यांचे मोफत कर्करोग, रक्त व साखर तपासणी केली जाणार आहे व त्यांचे रिपोर्ट्स ही तात्काळ देण्यात येतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचे अतिशय ह्रदय व भावस्पर्शी सादरीकरण अभिनेते योगेश जी सोमण यांनी केले. श्री सुनील महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मंदार चिकणे यांनी आभारप्रदर्शन व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *