Chikhli News : सोशल मीडियात न अडकता तरुणांनी मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे : डॉ. किशोर यादव

Chikhli News : सोशल मीडियात न अडकता तरुणांनी मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावे : डॉ. किशोर यादव

कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयामध्ये ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे आयोजन

Pckhabar- तारुण्यांमध्ये आपण जो कंटाळा करतो त्याचा परिणाम आरोग्याच्या बाबतीत हा प्रकर्षाने पुढच्या टप्प्यात जाणवतो. फेसबुक, व्हाट्सअप या सोशल मीडियात अडकलेली पिढी ही जर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम झाली नाही तर अपयश आल्याशिवाय राहत नाही म्हणून आरोग्याचा सर्व बाजूनी विचार होणे महत्वाचे आहे, असे मार्गदर्शन देहू गाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर यादव यांनी केले.

चिखली येथील महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयामध्ये ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉक्टर किशोर यादव यांनी आरोग्याचा महामंत्र आणि तरुणाई या विषयावर गुंफले. या व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांनी केले. पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे मुख्य समन्वयक राजेंद्र घावटे, प्रितम प्रकाश महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जलतज्ञ आणि महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील होते. या कार्यक्रमासाठी देहूचे आदर्श उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, दंगलकार कवी स्वप्निल चौधरी, प्राचार्य सदाशिव कांबळे, डॉक्टर प्रणाली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. किशोर यादव पुढे म्हणाले, आहार, विहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य महत्वाचे आहे. तसेच त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांना आलेले आरोग्याचे अनुभव आणि सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना येणाऱ्या पेशंटच्या समस्या यावरून आपले अनुभवही डॉ. यादव यांनी कथन केले.

राजाभाऊ गोलांडे यांनी या ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेचे यश मांडत असताना ही व्याख्यानमाला गेले सात वर्ष काम करते आहे व येणाऱ्या पिढ्यांना वैचारिक प्रबोधन करत आहे असे म्हटले. राजेंद्र घावटे यांनी तरुणांना संदेश देताना प्रत्येक नव्या वर्षांमध्ये आपण काहीतरी नवा संकल्प केला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये यशाच्या टप्प्यावर असताना या संकल्पना अनन्यसाधारण महत्त्व असते त्यासाठी व्याख्यानमाला आवश्यक असतात असे नमूद केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अनिल पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या बाबतीत सकारात्मक रहात असताना बाकीच्या सामाजिक आणि व्यक्तिमत्व घडवताना बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आत्मसात करायच्या असतात शिवाय ह्या सर्व गोष्टी स्वतःहून आत्मसात करायच्या असतात असा मोलाचा सल्ला दिला.
याप्रसंगी स्वप्निल चौधरी त्याचबरोबर सचिन पुजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक प्राचार्य प्रा. प्रदीप कदम यांनी केले आणि या व्याख्यानमालेमागचा प्रमुख उद्देश सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सिद्धार्थ डोंगरे यांनी तर आभार प्राध्यापक गणेशराज कसबे यांनी मांडले.
या व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी कष्ट घेतले. यावेळी या व्याख्यानाचा लाभ बीबीए, बीसीए, बीए व बीकॉम या सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *