Article By Dr Anjali Mulke : “आकर्षण, भावनीक घुसळण आणि आयुष्याची गाळण”

Article By Dr Anjali Mulke : “आकर्षण, भावनीक घुसळण आणि आयुष्याची गाळण”

Pckhabar -आज पुन्हा या विषयावर प्रासंगिक म्हणा किंवा पुन्हा पुन्हा तोच राग आळवण्याची गरज म्हणा, हा विषय चर्चेला घ्यावा लागत आहे..!
प्रसंगानुरूप चालू..
परवा क्लिनिक मध्ये एक विशीतली मुलगी आणि तिची मैत्रीण आली.. पेशंट संपण्याची वाट बघून, शेवटी माझ्या केबिनचं दार पुढे करून हलक्या पावलांनी आणि दबक्या आवाजाने त्या आत आल्या, तेंव्हाच त्यांच्या येण्याचे प्रयोजन मी ताडले.. कारण अशी कृती मी पहिल्यांदा पाहत नव्हते..!
अपेक्षेप्रमाणे, त्यांनी हळूच सांगायला सुरुवात केली..
तिची मैत्रीण म्हणाली, “मॅम, माझ्या मैत्रिणीने एक घोळ केला.. ती आता प्रेग्नंट आहे.. युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटीव्ह आली.. आता काय करायचं..!? घरी आई वडिलांना ही गोष्ट कळू द्यायची नाही..!”
मी डिटेल्स विचारले..
बाई, लग्न झालंय का? – नाही
मुलगा कोण आहे? – बॉयफ्रेंड
ओळखीतला, नात्यातला, गावाकडचा वगैरे आहे का? – नाही
तू काय करते? – काहीच नाही, पोलीस ट्रेनिंगची तयारी करत होते.
तो कुठे आहे? – गावी गेला
त्याला सांगितलं का हे? – हो
कधी येणार तो? – माहीत नाही
तिला अजून बरेच प्रश्न विचारल्या नंतर सांगितलं, की, त्याच्या किंवा तुझ्या घरच्या मोठ्या माणसांना घेऊन ये आणि कौन्सिलींग करून पाठवून दिलं..!
ही एकच नाही, शेकडोंनी अशा केसेस आपल्या भारतात डॉक्टर्स कडे येतात..

स्वतःची आर्थिक मजबुती नाही.. स्वतःचं कसलं कर्तुत्व नाही.. करियर नाही.. नात्याला कसले नाव नाही.. अगदी मुलाच्या देखील भविष्याची आणि पुढच्या प्लॅनिंगची माहिती नसताना, मुली हे असले धैर्य का करतात..!?
प्रेम प्रेम म्हणून भावनिक होऊन, शारीरिक आकर्षणाला प्रेमाचे नाव देऊन, वाहवत जात काही क्षणांच्या मौजेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अंधारात टाकतात..
आता यात जर मुलाने जबाबदारी झटकून दिली, घरून चोरून हे कृत्य केलेले असल्यानंतर आणि सामाजिक, आर्थिक कुठलीही सक्षमता नसताना, अशा वेळी काय निर्णय घेणार या मुली..!?

चूक मुलींचीच असते असं नाही.. मुलं देखील अशा आकर्षणात मजा म्हणून वाहवत जातात..
आणि त्यांच्याही करियरची पहाट काळरात्रीत बदलून बसते..!
यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नाही..
कौटुंबिक व सामाजिक विरोध होतो..
आणि मग तथाकथित प्रेमाला महत्व देत, जन्मदात्या, पालनकर्त्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन, आपलं वेगळं बस्तान, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या गोंडस नावाखाली बसवलं जातं..!
मग यातून कधी कोणाची श्रद्धा वालकर होते, पस्तीस तुकड्यांत कट करून फेकून दिली जाते..
किंवा अजून कल्पनेच्या पलीकडे, काही केसेस मध्ये त्यांच्या आयुष्याची प्रॉस्टीट्युशन सारख्या वाटेने विल्हेवाट लावली जाते..
तर कधी कुठलाही आधार राहिला नसल्याने महिला आश्रम, सदने भरली जातात..
किंवा काही वर्षाच्या एकत्र वास्तव्यानंतर विभक्त होऊन एकल आयुष्याचे ताट आपल्या पुढ्यात वाढून घेतात..!

का अशा घटनांना वारंवार मुली बळी पडतात..!?
स्वतः सारासार विचार न करता, एक ‘आधार’ मुली शोधत असतात..
आपल्या एक सुखी आयुष्यासाठी आपण स्वतः पायावर उभं राहून सक्षम होण्यापरी, असा एक आधार शोधून, बिनधास्त आपण सुखी आयतं आयुष्य जगावं, या भ्रामक कल्पनेत मुली वावरत असतात..!
आणि कमी वयातच, सगळी बंधनं झुगारून, अशा आधारालाच आपलं भविष्य आणि सर्वस्व मानतात..!
ह्याला चुकीचं म्हणावं इतकंही हे तसं नाही..!

स्त्रियांमध्ये नैसर्गिक रित्या एक समर्पण भाव असतो..
केवळ शरीरानेच नव्हे, तर तन मन धन आणि इतर सर्व तिच्या मालकीच्या म्हणून तिला वाटणाऱ्या अगदी सर्वच गोष्टींवर, ती आपल्या जोडीदाराला भावनेने ओतप्रोत होऊन या सर्वांची मालकी अगदी स्वखुशीने बहाल करते..
त्यामागे ती तात्कालिक विचार करून तो समर्पण भाव अंगिकारते..
बहुतेक स्त्रिया, दूरगामी विचार करण्यात कमी पडतात किंवा त्यांना स्वतःच्या त्यावेळच्या भावनांचे प्राबल्य, दूरचा, भविष्यातील आपल्या आयुष्याचा विचार करण्यापासून अडवते..!
असं नाही की त्या मूर्ख असतात, किंवा भित्र्या असतात..
पण भावनांच्या प्राबल्याला प्राधान्य देणे त्या अधिक पसंत करतात..!

आणि कधी केंव्हा, सगळं सहन करून, कळून देखील, त्यांना समोरच्या व्यक्तीने मागितलेल्या माफ्या आणि मागे स्वार्थ दडलेला लाचारीचा मुखवटा, बघून कुठेतरी त्यात त्यांना आपल्या निस्सीम प्रेमाच्या नात्याची नौका वाचवण्याचा एक आशेचा किनारा दिसत असतो.. त्यांना आपलं नातं टिकवायचं असतं..
त्यामुळे त्या, कित्येकदा सगळं काही माहीत असूनदेखील भावनेच्याच भरात त्याला माफ करत जातात..
त्याला पुन्हा मायेने जवळ घेत जातात..!

सगळ्याच स्त्रिया अती भावनिक नसतात..
पण सहसा जास्तीत जास्त स्त्रियांत नैसर्गिक भावनिक कोमलता हा गुण किंवा बऱ्याचदा दुर्गुण म्हणा, हा स्वाभाविक असतो..
आणि या भावनिक तरंगावर अलगद तरंगत राहणं त्या अधिक पसंत करतात..
आपल्या आयुष्याची नौका, कोणीतरी आधार देऊन अलगद पार करावी, अशा अपेक्षेत त्या असतात..
आणि मग पुढे आयुष्यात त्या तरंगात उठलेल्या भोवऱ्यांना त्या नियंत्रित करू शकत नाहीत.. आणि मग तो भवरा त्यांचं आयुष्य रसातळाला नेतो..!

तरुणपणी असणाऱ्या नैसर्गिक शारीरिक आकर्षणाच्या सहज भावनांवर नियंत्रण करणे, हे प्रत्येकालाच जमतं असं नाही..!
किंबहुना , आपल्याकडे किशोवयीन मुलं आणि मुली, यात पटकन अडकत जातात..
आजकालच्या बॉलिवुडच्या बीभत्स भपक्याच्या प्रभावाखाली असणारे तरुण आणि शाळकरी मुलं मुली, नवख्या शरीरधर्मालाच आधी प्राधान्य देऊ लागले आहेत..
आणि त्यात अडकत जाऊन अगदी कमी वयातच आपल्या आयुष्याला स्वतःहून त्याच एका विषयाच्या विखारी केंद्रकाभोवती मांडून ठेवू लागले आहेत, ज्यामुळे आयुष्यात कुठलेही निर्णय, कुठलाही विकास साधायचा असला, तरीही, हा विषय, त्यात झालेली गुंतागुंत, त्या सर्वांच्या आड येत जाते.. आयुष्य जटिल होत जातं.. आणि मग आयुष्य दुर्दैवाने कदाचित इतर कोणाकडून किंवा स्वतः संपवलं जातं..!!

खरं तर, स्त्रियांना निसर्गाने अनेकविध वरदान दिले आहेत..
स्त्रिया मानसिक रित्या पुरुषांपेक्षा अधिक बलशाली असतात.. सोशिक असतात.. प्रसंगातून लढून बाहेर निघत आयुष्याला पुन्हा संपूर्ण ताकतीने सामोरे जाण्याची एक अद्भुत पात्रता त्यांच्या अंगी असते.. अगदी मांँ दुर्गा..!
किंबहुना, त्यांना तर एखाद्याची नजर देखील काय बोलते, हे ओळखू येण्याची नैसर्गिक सहज आकलन शक्ती असते..
कोणाची नजर कशी आहे, चेहऱ्यावर काय भाव आहेत, हे त्या सहज ताडू शकतात..
त्यांना शरीराच्या बाबतीत कदाचित निसर्गाने अधिक जिम्मेदाऱ्या दिल्या असल्या तरीही, त्या ते पार पाडत आपल्यावरचे शारीरिक व मानसिक आघात झेलून देखील त्यातून निघून आयुष्य धीराने जगतात..
पण याचा अर्थ असा नाही, की ती सोशिक आहे, म्हणून तिच्यावर अन्याय करण्यास समाजाला मुभा मिळावी..!

असंही नाही, की, ती नेहमीच भित्री असते..
पण कित्येकदा, सामाजिक खोट्या मुखवटी परंपरेचा दबाव आणि तिच्या वलयातील लोकांची अत्याचारी वागणूक, यामुळे बऱ्याचदा तिला दबावाखाली आणि भीती खाली राहावे लागते..!
कित्येकदा काही महिलांच्या काळजाच्या तुकड्यांना, म्हणजे तिच्या मुलांना ओलिस ठेवून, तिच्यावर अत्याचार करण्याचं हत्यार म्हणून वापरलं जातं..
किंवा अगदी समाजमान्य लग्नानंतरही, मुलांच्या कल्याणासाठी, तिला नको असलेल्या त्रासदायक नात्याच्या बंधनात अडकून पडावं लागतं.. ते नातं सर्वच दृष्टिकोनातून सहन करावं लागतं..!

पुरुषी मनोवृत्ती एकच, की तिने माझ्या अखत्यारित राहावं.. पायाखालचा जोडा बनून राहावं..
तिला स्वतंत्र अस्तित्व आहे, ती एक स्वतंत्र मनुष्य आहे, तिला आत्मा, जीव, भावना सगळं आहे, हे देखील समाजातील बहुतांशी पुरुष विसरले आहेत..
पुरुषच काय, स्त्रियादेखील, स्वतः स्वतःचं अस्तित्व विसरतात.. आणि बापानंतर पती आणि त्यानंतर मुलगा अशा आधाराला चिकटून राहतात..!
आजही खेडो पाडी, स्त्रियांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्य नाही..
आजही ती तिच्या शिक्षणासाठी झगडते आहे..
आजही ती आर्थिक दृष्ट्या बहुतांशी घरात परावलंबी आहे..
ती आर्थिक दृष्ट्या घरच्या पुरुषावर अवलंबून असल्याने तिचे तोंड त्यांच्या उपकाराच्या धाग्याने शिवून टाकलेले असते.. तिने काही मागणी करू नये.. की कसली तक्रार करू नये..!
दोन वेळचे जेवण आणि झोपायला जागा मिळते आहे, त्यात स्वतःला संपूर्णपणे बहाल करून टाकावं, अशी मानसिकता असते..!
आजही, सामाजिक दृष्ट्या थोतांड परंपरेच्या बेड्या तिच्या पायात आहेत..
आजही तिच्या वाट्याला चूल आणि मूल ह्याच जुनाट आणि बुरसट, घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांच्या सोशिक यातना वाट्याला आहेत..
हे बोलताना, वाचताना जरी जुनं पुराणं वाटत असलं, तरीही, बहुतांश स्त्रियांची, मग त्या उच्चशिक्षित असो वा कमी शिक्षित वा अशिक्षित, हीच सामाजिक अवस्था गाव शहरांत अजूनही आहे..!
कारण अजूनही समाजाची मानसिकताच बदललेली नाही..
या अशा समाजात, केवळ पुरुषच नाहीत, तर यात खुद्द स्त्रिया देखील आहेत, ज्या स्वतः स्त्री असून देखील, आपल्या समोरच्या स्त्रीची व्यथा, परिस्थिती समजू शकत तर नाहीतच, पण त्यांच्या सर्वांगीण ऱ्हासाला जबाबदार ठरतात..!

पण, सगळेच सरसकट पुरुष, स्त्रिया या मानसिकतेचे नसतात..
काही मांँ जिजाऊ, सावित्रीमाई, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी, आचाराशी सहमत असलेले असतात..! पण ते तुलनेने संख्येने कमीच, हे आपल्या समाजाचं दुर्दैव..!
आज जर छत्रपतींनी रांझ्याच्या पाटलाला दिलेला दंड , चौरंगा, तत्सम शिक्षा कायद्याने अंमलात आणल्या, तर का या पुरुषी विकृतीला जरब बसणार नाही..!? का ते वारंवार धजावतील..!?

आज संविधानात उत्तम अभ्यासाद्वारे कायदे लिहून देखील, त्यातून पळवाटा काढून, हे लोक उजळ माथ्याने फिरतात.. आणि कोपर्डीची श्रद्धा असो वा मुंबईतील वालकरची श्रद्धा, निर्भया सारख्या मुलींचा वारंवार बळी जातो.. आणि आपण काही दिवस सोशल मीडियावर मेणबत्त्या पेटवून पुन्हा काही दिवसांनी तेच परतून ऐकण्याशिवाय काही करत नाही..!
षंढ समाजाला स्वार्थीपणाचा जर्जर असाध्य रोग जडलाय..
जोपर्यंत, आपल्या घरातील मुलींवर असा हात घोंगावत येत नाही, तोपर्यंत आपला हात उचलण्याची आपली मानसिकताच नाही.. दुसऱ्यांच्या मुलीसाठी आपल्याला कणभर कणव नाही, हाच स्वार्थीपणा आपल्याच घरातून सुरू होतो.

या वरील सर्व गोष्टींचा, केवळ एकाच मुलीवर परिणाम होऊन थांबत नसतो.. तर याचे पडसाद खोलवर सामाजिक स्तरावर होत असतात..
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रयत्नांनी आज कैक झगड्यानंतर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अधिकार मिळवणाऱ्या मुलींच्या सामाजिक वावरावर आपसूकच बंधने येत जातात..
समाजातील वाढत्या राक्षसी प्रवृत्तींना आपल्या मुली बळी पडतील या भीतीने, पालक तिच्या शिक्षणावर,तिच्या स्वातंत्र्यावर करायचा खर्च तिच्या लग्नावर करणे पसंत करतात.. आणि पुन्हा तिच्या भोवती तेच सामाजिक ‘चूल आणि मूल’चं दुष्टचक्र फिरू लागतं..!

या सामाजिक नकारात्मक बदलाला, समाजासोबतच सरकार देखील तितकेच जिम्मेदार आहे..!
सरकार तर असे आहे, की काही बोलताच सोय नाही..!
इतर सरकारांना मौनावर दोष देणारे लोक, आज कोणत्या गोष्टीवर मौन बाळगावे आणि कुठे तोंड उघडुन बोलावे, यात पूर्णतः संभ्रमित अवस्थेत असलेले दिसतात..!
महिला सक्षमीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, हे केवळ प्रोग्राम इव्हेंट वाटावेत, इतके ते तकलादू वाटू लागतात..!
महिला आयोग वगैरेंनी तर केवळ मेकअप, उंची कपडे नेसून, केवळ नामवंत स्त्रियांच्या चिमटीभर समस्येवर टीव्ही वर बाईट देण्याव्यतिरिक्त कुठले असे भरीव काम केले आहे, हे माझ्या या जन्मात तरी ऐकिवात नाही..!
केंद्र आणि राज्य स्तरावरील महिला आयोग, महिला बाल मंत्रालय, सरकारी धोरणे, योजना.. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत असणारी न्यायपालिका, कितपत महिलांना सामाजिक न्याय देऊ शकली आहे..!?
मोजक्या केसेस सोडल्या, तर आजही कित्येक केसेस प्रलंबित आहेत..!
फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस महिने, वर्षे चालतात.. त्याच्या त्या नावाला तरी अर्थ उरतो का..!?

आज भारत, महिला अत्याचारावरचे जणू जागतिक प्रमुख हब बनला आहे..!
ज्या भारताला, मातृसत्ताक परंपरेचा इतिहास आहे.. जिथे मांँ दुर्गा विविध रूपात पूजली जाते..
ज्या भारतापासून, सगळ्या जगाने स्त्री सन्मानाचे धडे गिरवले, त्या भारताची ही केविलवाणी अवस्था का व्हावी..!?
पराकोटीची राजकीय अनास्था, समाजाची पुन्हा पुन्हा उफाळून येणारी मनुवादी प्रवृत्ती, तसेच शिक्षणाचा मांडलेला बाजार आणि इंटरनेट ची कमी भरती कृपा, या सगळ्याच्या विळख्यात, समाजातील सगळ्यात सर्जनशील असलेला घटक पिसला जातोय..!

आज स्त्री एकटी जरी उभी राहण्याचा प्रयत्न करत असली, तरीही, समाजातील गिधाड तिच्यावर नजर ठेवून असतात..
विधवा किंवा घटस्फोटित एकल पालक असणाऱ्या स्त्रीला, आजही शैक्षणिक संस्थांमध्ये, दवाखाने किंवा इतर कार्यालयात, आपल्या पाल्याच्या नावासमोर, बापाचे नाव टाकण्यासाठी अरेरावीसह सक्ती केली जाते..! सहकार्याची भावना तर दूरच..!
आज, कित्येक स्त्रिया उच्चशिक्षित आहेत, पती प्रमाणेच चांगल्या पगारी नोकरीवर किंवा व्यवसायात आहेत.. पण तिला ह्या कामांच्या सोबत घरातली सगळी सांसारिक कामं करावीच लागतात.. कारण तसा आपल्या समाजाचा पायंडा किंवा दंडकच आहे..!
शिकलेली नसली, तरीही, शेतात, दिवसभर राबून किंवा छोटा व्यवसाय दिवसभर सांभाळून, घरातील सगळी सांसारिक जबाबदारी तिच्याच नावे लिहिलेली असते..!
आणि केलं नाही, तर शिव्यांची लाखोळी.. कधी कधी मारहाण देखील..!!

समाजाच्या मानसिकतेत बदल कधी आणि कसा होणार..!?
समाज एका घटिकेत बदलत नसतो..!
त्यासाठी सर्व स्तरातून प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न व्हायला हवे..!
केवळ स्त्री शक्तीचा दिखावा नको..!
आठ मार्चच्या महिलादिनी उत्सवी दिखाव्यापेक्षा, तो जो दिखावा त्या दिवशी करता, तो सर्वंकश बदल वास्तवात दिसायला हवा..!
मुलींना (आणि मुलांना देखील), शैक्षणिक आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणं हे पालकांचं आणि समाजाचं तसंच सरकारचं देखील कर्तव्य आहे..!
समाजातील कोणत्याही एका घटकाच्या उत्कर्षासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातभार लावावा लागतो..!

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बदल घडवायचा असेल, तर मुलींनी स्वतःपासून सुरुवात करायला हवी..!
आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घेण्याचा अधिकार आपला असला तरीही, आधी संपूर्ण आर्थिक स्वावलंबी आणि शारीरिक मानसिक सक्षम झाल्याशिवाय पर्याय नाही..!
आयुष्यात केवळ जोडीदार मिळवणं, हाच एक संकल्प नसावा, तर सशक्त आणि सक्षम , स्वावलंबी आयुष्य जगणं हे ध्येय असावं..!
“जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा, एक ताईचा..” असलं म्हणत नाजूकपणे स्वतःला कुरवाळत काचकुडीची बाहुली होऊन जगण्यापेक्षा, कोणी मांँ जिजाऊ व्हावं, कोणी सावित्रीमाई, कोणी इंदिरा, तर कोणी कल्पना चावला आणि मेरी कॉम.. कित्येक आदर्श नावं आहेत.. त्यातलं एक नाव बनण्याची जिद्द असावी.. आणि नसेलच तर निदान, परावलंबी होऊन लाचार जगू नये, इतपत तरी बळकट व्हावं..!
सोळा शृंगार करून स्वतःला एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे सजवून मुलांसमोर गरबा दांडिया मध्ये ‘प्रेझेन्ट’ करण्यापेक्षा, नवरात्रीतील त्या मांँ दुर्गेची शक्ती आणि मांँ सरस्वतीचे ज्ञान घेऊन एखाद्या सामाजिक कार्याला हातभार लावावा..!
आपल्याला मिळालेल्या सामाजिक, शैक्षणिक स्वातंत्र्याचा लाभ घेत, आत्मोन्नती साधून घ्यावी.

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे ध्यानी असू द्यावं..!
शरीरधर्मच म्हणजे आयुष्य नव्हे.
तुका म्हणे –
विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी !!
भावनांच्या भरात वाहत जाऊन आयुष्याची गाळण करून घेऊ नका..!
विश्वास कोणावर आणि कितपत ठेवावा, हे ओळखता आलं पाहिजे..!
आपल्या भावनांना आपल्यावर प्रभावी होऊ न देता, सद्सद्विवेक बुध्दी सतत तेवत ठेवावी, ही काळाची गरज आहे..!

कोण काय करावं, हा लिहिण्याचा विषय नाही..
पण स्वतः वर कोणती वेळ आणावी, आपलं भविष्य काय असावं, हे आपणच ठरवावं..!
कारण आपल्या वर्तमान वागण्यावर आपलंच नाही, तर समाजातील इतर मुलींचं आणि येणाऱ्या पिढीचं भविष्य अवलंबून असतं..!
शेवटी, जन्म देणाऱ्या आपणच..
समाज घडवणाऱ्या आपणच..
आणि समाजात बळी जाणाऱ्या आपणच..!
कोण व्हायचं, ते आपण ठरवावं..!
कारण, प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवट, हा आयुष्याच्या सुरुवातीतच दडलेला असतो..
आणि ती सुरुवात सर्वस्वी आपल्याच हातात असते..!
©️®️ *डॉ.अंजली मुळके*
मुंबई
फोन-8879063132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *