Talegaon Dabhade News: सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमा अंतर्गत जर्मन पाहुण्यांची fahrspielern अकादमीला भेट
Pckhabar- तळेगाव दाभाडे येथील fahrspielern अकादमीला २ जर्मन पाहुण्यांनी भेट दिली क्रिस्टिना व जेनिफर या दोघींनी या वेळेस भारतीय संस्कृतीचा अनुभव घेतला. भारतीय संस्कृती व जर्मन विचारांची देवाणघेवाण ही विद्यार्थ्यांसाठी मोलाची ठरली.
येथील विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे संक्षिप्त दर्शन घडवले. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या राज्यांप्रमाणे वेशभूषा केली होती. पाहुण्यांचे स्वागत औक्षण व राज्यांची ओळख तसेच गणेश वंदनेने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पहुण्याशी संवाद साधला. विविध प्रश्न उत्तरांमधून विद्यार्थ्यांनी सर्व पैलूंनी जर्मन संस्कृती व विचारसरणी समजून घेण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांनी जर्मनीतील कामाचे स्वरूप, बोलीभाषेचे विविध प्रकार, जर्मनी व भारतातील साम्य व फरक इत्यादी बाबींवर प्रश्न विचारत संवाद साधला. कार्यक्रमाची सांगता एका जर्मन गाण्याने करण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यातील खास खाद्यपदार्थांचा पाहुण्यांनी आस्वाद घेतला. भारतीय खाद्यसंस्कृती व येथील विविधता याचे त्यांनी कौतुक केले. आपल्या प्रथा-परंपरा त्यांना आवडल्या. त्यात रस दाखवत, त्याबद्दल अनेक प्रश्न विचारत, पाहूण्यांनी त्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांची समरसता, नेटके नियोजन यामुळे कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडला.







Leave a Reply