Dehu News : जात पात बाजूला सारून मानवतावादी संस्कृती रुजवणे काळाची गरज – डॉ. श्रीपाल सबनीस
देहूत डॉ. अहेफाज मुलाणी लिखित ‘काही काटे काही फुले’ कवितासंग्रह प्रकाशित.
Pckhabar- आजच्या समाजात सलोखा नांदायचा असेल तर स्वतःला जाती पातीच्या विळख्यातून सोडवून मानवतेचे उपासक बनणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
निमित्त होते डॉ. अहेफाज मुलाणी यांनी लिहलेल्या ‘काही काटे काही फुले’ या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्याचे. हा भारत देश सर्वांचा आहे, सर्व जाती पाती विसरून गुण्यागोविंदाने नांदणे ही खरी संस्कृती आहे. मानवतावाद हा संस्कृतीच्या केंद्रस्थानी असायला हवा. धर्मकेंद्रीत राजकारण, समाजकारण या देशाला अधोगतीकडे नेतील. त्यामुळे साहित्यिकांनी मानवतावादी दृष्टीकोन बाळगून जाती धर्माच्या विळख्यातून बाहेर पडून साहित्याची मांडणी करण्याची जबाबदारी स्विकारावी जी डॉ. मुलाणी यांनी स्विकारल्याचे दिसते. मुस्लिम जन्म संदर्भ लाभूनही हा कवी आपल्या कवितांमधून शिवबाचे महत्व व्यक्त करतो. मराठीला माय माऊली मानून आपला कवितासंग्रह मराठी भाषेला अर्पण केल्याने आपल्याला या कवीचे विशेष कौतुक वाटते असे उद्गार डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
या प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक कामगार नेते श्री. अरूण बोऱ्हाडे, श्री दादाभाऊ गावडे, ह. भ. प.प्रशांत महाराज मोरे, संदीप तापकीर, प्रा. विकास कंद, किरीटी मोरे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कवी डॉ. मुलाणी यांना घडवण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या श्री संभाजी नवले, श्री. मधुकर असबे, श्री. कबीर भंडारे, श्री. ईश्वर जगताप, श्री. श्रीमंत सूर्यवंशी, श्री. किरण कुंभार या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
खेड्यापाड्यात वाचन संस्कृती रुजवणाऱ्या वाचनवेड संस्थेचे प्रमुख श्री. किरीटी मोरे, श्री.मयूर सेठ, अभंग प्रतिष्ठान देहू यांना तर वंचितांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारी संस्था म्हणून कर्तव्य फाऊंडेशन देहू यांनाही गौरविण्यात आले. सूत्रसंचालन गझलकार संतोष घुले यांनी केले.










Leave a Reply