Talegaon Dabhade News : मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, सात दिवस शिबिर; सुमारे 1 हजार नागरिकांचा सहभाग

उद्योजक माजी नगरसेवक निखिल भगत यांचा पुढाकार
यापुढेही नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेणार : माजी नगरसेवक निखिल भगत आणि डॉ. नेहा कुलकर्णी यांचे आश्वासन
Pckhabar- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, बांधकाम समितीचे माजी सभापती निखिल भगत, योगिराज क्लिनीक, संकेत आय क्लिनीक आणि गौरव मेडिकल स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतनगर-तपोधाम कॉलनीतील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात दिवस सुरू असलेल्या या शिबिरात सुमारे 1 हजार नागरिकांची, लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
तळेगाव दाभाडे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील योगिराज क्लिनिक, गौरव मेडिकल स्टोअर मागे येथे हे शिबिर दि. 16 ते दि. 21 ऑगस्ट या कालावधीत पार पडले. शिबिराचे उद्घाटन
माजी नगरसेवक, बांधकाम समितीचे माजी सभापती निखिल भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नेहा कुलकर्णी, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, गौरव वाघचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात ब्लड प्रेशर तपासणी, डायबेटिस- रक्त व लघवी तपासणी,
व्हिटॅमिन बी १२, डी व सीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मोफत वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.
खास मुलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी, सुवर्णजल प्राशन व जंताचे औषध देण्यात आले. मुलांसाठी खाऊ व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. ४० वर्षापुढील नागरिकांसाठी डोळ्यांचे प्रेशर (काचबिंदू) तपासणी करण्यात आली.
सात दिवस सुरू असलेल्या या शिबिरात योगिराज क्लिनिक (डॉ. नेहा कुलकर्णी), संकेत आय क्लिनिक (डॉ. राजेंद्र कुलकर्णी, नेत्रतज्ञ ) या नामवंत डॉक्टरांनी रूग्णांची तपासणी केली. तसेच यापुढेही नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात येतील, असे माजी नगरसेवक निखिल भगत आणि डॉ. नेहा कुलकर्णी यांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना माजी नगरसेवक, बांधकाम समितीचे माजी सभापती निखिल म्हणाले ” स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून यशवंतनगर-तपोधाम कॉलनीतील नागरिकांसाठी सात दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे साथीचे आजार बळावले आहेत. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही भगत यांनी यावेळी केले.”











Leave a Reply