Dehu Crime News : महावितरण कार्यालयास टाळे ठोकल्याने भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा
Pckhabar- देहूगाव येथील महावितरणच्या कार्यालयास टाळे लावून आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी देहूगाव साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी भाजप स्वच्छ भारत अभियान पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सदाशिव हगवणे (वय ४०), सचिन मारुती मराठे (वय ४०, दोघे रा. देहूगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र मोहन डवरी (वय ३५, रा. चिखली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डवरी हे गुरुवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात काम करीत असताना भाजप पदाधिकारी त्यांच्या कार्यालयात आले. आम्ही तुमच्या वरिष्ठ कार्यालयास नोटीस देऊन देखील कायमस्वरूपी सहायक अभियंता देहूगाव शाखेसाठी उपलब्ध झालेला नाही. वीजपुरवठा नेहमी खंडित होतो. आम्ही टाळा ठोकून कार्यालय बंद आंदोलन करणार आहोत. तरी तत्काळ हातातील काम बंद करा आणि बाहेर निघा, असे बजावले. त्यावर ‘मला माझे शासकीय काम करू दे’, अशी विनंती फिर्यादी यांनी केली असतानादेखील आरोपींनी त्यांना कार्यालयात जाण्यास अटकाव केला. महावितरण कार्यालयाला बाहेरून टाळा लावत सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.










Leave a Reply