Pimpri News: दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिम्मित महापालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा

Pimpri News: दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिम्मित महापालिकेतील कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा


Pckhabar- आपल्या देशाच्या अहिंसा आणि सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून दहशतवादाचा आणि हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची सामुहिक प्रतिज्ञा आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली.

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाचे औचित्य साधून आज महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रतिज्ञापत्राचे वाचन आयुक्त पाटील यांनी केले.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, निलेश देशमुख, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

देशातील नागरिकांना दहशतवाद आणि हिंसाचारापासून दूर ठेवण्याची, संपूर्ण मानवजातीमध्ये शांतता, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवण्याची आणि तो वर्धिष्णू करण्याची तसेच मानवी जीवीत आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली.

भारत हा विविधतेने नटलेला देश असून येथील सर्व नागरिक या देशात गुण्यागोविंदाने राहतात. या देशाच्या एकतेला आणि अखंडतेला अबाधित ठेवण्यासाठी भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचे तत्व अंगीकारून आपसात बंधुभाव जोपासला जावा, देशविघातक कृत्यांना थारा न देता देशाभिमान अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मानवजातीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *