Pimpri News: मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी न्यायालयात जाणार : विकास डोळस

Pimpri News: मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी न्यायालयात जाणार : विकास डोळस

– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

– बोपखेलमधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पावरुन नवा वाद

Pckhabar- बोपखेलमधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पावरुन महापालिका प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मैलाशुद्धीकरण प्रकल्पावरुन प्रशासन दुजाभाव करीत आहे, असा आरोप करीत नागरिकांच्या हक्कांसाठी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, मैलाशुद्घीकरण प्रकल्प कार्यान्वयीत करणाऱ्यात हलगर्जीपणा करणाऱ्या सोसायट्यांवर कारवाई करण्याचे आदेश आपण महापालिका प्रशासनाला दिले आहेत. शहरातील पर्यावरण संवर्धन आणि नागरी आरोग्याच्या दृष्टीने आपल्या भूमिकेचे स्वागत करावे लागेल. प्रशासक म्हणून आपली भूमिका धडाकेबाज आहे. मात्र, मैलाशुद्धीकरण प्रकल्पाबाबत प्रशासनचा सोसायटीधारकांना एक न्याय आणि स्वत: मात्र कोरडे पाषाण अशा भूमिकेत अधिकाऱ्यांना एक न्याय… असा दुजाभाव का केला जातोय? याचे आश्चर्य वाटते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोपखेल समाविष्ट होवून सुमारे २० वर्षे झाली. मात्र, आजही गावात विविध पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. एका बाजुला संरक्षण विभागाची हद्द आणि दुसऱ्या बाजुला नदी यामुळे गावच्या विकासात अनेक अडथळे होते. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात अनेक रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, महापालिका प्रशानाच्या वतीने बोपखेलमधील निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय भाजपा सत्ताकाळात घेण्यात आला. निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, पहिल्यांदा ‘एनजीटी’ अर्थात राष्ट्रीय हरित लवादाकडून अडथळा निर्माण झाला. दुसऱ्यावेळी एनजीटी, राज्य सरकार, युडी अशा सर्व विभागांची परवानगी घेवून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर करारनामाही झाला. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कार्यादेश दिलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दबावाखाली हे कार्यादेश थांबवण्यात आले.

याबाबत माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी जाहीरपणे संबंधित एसटीपी प्रकल्पाचे काम राष्ट्रवादीच्या मागणीनुसार थांबवल्याचे प्रसारमाध्यमांना कळवले. त्यामुळे प्रशासन राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. राष्ट्रवादीच्या आरोपानुसार निविदा प्रक्रियेत त्रूटी आहेत, तर मग निविदा प्रक्रियाच रद्द करुन बोपखेलवासींचा मार्ग मोकळा करावा, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही डोळस यांनी म्हटले आहे.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का?
तसेच, निविदा प्रक्रिया रद्द केल्यानंतर पहिली, दुसरी आणि आता तिसरी निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर वाया गेलेला वेळ आणि वाढणारा खर्च याबाबत आपण संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार आहेत का? किंवा हजलर्गीपणा केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार आहेत का? हेसुद्धा प्रशासक म्हणून जाहीर करावे, असे आव्हान विकास डोळस यांनी दिले आहे. तसेच, प्रशासक राजवट लागू झाल्यामुळे आपण शहराचे पालक आहात. बोपखेलवर झालेला अन्याय हा चुकीचा आणि असंवैधानिक आहे. राष्ट्रवादीच्या म्हणण्यानुसार निविदा प्रक्रिया चुकीची असेलत ती रद्द करावी आणि नव्याने निविदा राबवून प्रकल्पाचे काम मार्गी लावावे, अन्यथा बोपखेलकरांच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयीन लढा उभारणार आहोत, असेही म्हटले आहे.

मुळा नदीची गटारगंगा झाली…
वास्तविक, बोपखेल आणि परिसरात निर्माण होणारे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता मुळा नदीत थेट सोडले जाते. त्यामुळे जलसृष्टी धोक्यात आहेत. त्याचसोबत नदीचीही गटारगंगा झाली आहे. पर्यावरण संवर्धन आणि नागरी आरोग्याच्या दृष्टीने आपण सोसायटीधारकांनी मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वयीत न केल्यास कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, ही बाब शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मात्र, प्रशासन राष्ट्रवादीच्या दबाखाली सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरीत असेल, तर परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे, असे म्हणावे लागेल, असा घणाघातही माजी नगरसेवक विकास डोळस यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *