Chinchwad News : पिंपळे गुरवमधील नव्याने केलेले काँक्रीटचे रस्ते पुन्हा पुन्हा तोडले जाताहेत : माजी नगरसेवक राजेंद्र जगताप
महापालिका आयुक्तांनीच पिंपळे गुरवचा दौरा करून कामांचा दर्जा तपासावा
Pckhabar- पिंपळे गुरवमधील सिमेंट रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, रामकृष्ण मंगल कार्यालय चौकाकडून नर्मदा गार्डन रस्त्याला जोडणारा रस्ता जागोजागी पुन्हा खोदण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. काँक्रीटीकरण खाली वर झाल्याने महापालिकेने हा रस्ता पुन्हा खोदल्याने नागरिकांच्या कररूपी पैशाचा हा अपव्यय आहे, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी लक्ष घालून संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.

महापालिकेच्या वतीने पिंपळे गुरवमधील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वीच खोदकाम करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यातच येथील सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे येथील रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून पुन्हा सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काँक्रीटीकरण केलेले अनेक पॅच खराब झाले आहेत. ते खोदून पुन्हा काम करून घेण्यात येत आहे. आतापर्यंत तीन वेळा हे पॅच तोडण्यात आले आहेत. तरीही हा रस्ता व्यवस्थित झालेला नाही. आता पुन्हा रस्ता खोदल्याने आणखी किती वेळा एकाच रस्त्याचे काँक्रीटीकरण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सुरवातीलाच या रस्त्याच्या कामाचा दर्जा पडताळून पाहिला असता, तर आज रस्ता खोदून सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची पुन्हा वेळ आली नसती. आधीच काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या खोदकामामुळे येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला होता. पुन्हा येथील रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. आता यापुढे आणखी किती दिवस त्रास सहन करायचा ते एकदा अधिकाऱ्यांनी सांगून टाकावे.
या आधीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सिमेंट काँक्रीटीकरण सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा ठेकेदारासोबत पाहणी करून घेणे अत्यावश्यक होते. लाखो रुपये खर्च करून इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकतात. यामध्ये येथील परिसरातील नागरीकांची देखील फरफट होत आहे.
महापालिकेने नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम करून घेण्यात आले. यावेळी महापालिकेचे लाखो रुपये तर पाण्यात गेलेच; शिवाय याला जबाबदार कोण? यावेळी ठेकेदाराने दोन पैसे अधिक कमविण्याच्या दृष्टीने येथील संपूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाचा केला खरा; पण यावेळी महापालिकेचे संबंधित अधिकारी डोळे झाकून बसले होते की काय? असा प्रश्नही राजेंद्र जगताप यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या पाच वर्षात विकासकामे होत असताना ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांवर कुणाचाच अंकुश नव्हता. कामे उरकण्याच्या नादात कामाच्या दर्जाकडे अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे पिंपळे गुरवमधील निकृष्ट दर्जाची कामे झालेले काँक्रीटचे रस्ते पुन्हा तोडण्याची वेळ आली आहे. मात्र, पुन्हा केली जात असलेली कामेही निकृष्ट दर्जाचीच होत आहेत. याकडे आता आयुक्त राजेश पाटील यांनीच लक्ष घालून अधिकाऱ्यांना जाब विचारावा.
– राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष










Leave a Reply