Maval News: हर्षदा खऱ्या अर्थाने भारतकन्या : रामदास काकडे

Maval News: हर्षदा खऱ्या अर्थाने भारतकन्या : रामदास काकडे

– इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे हर्षदा गरूडला एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान

Pckhabar- ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधवांनी घेतलेले कष्ट आणि आज हर्षदा व तिच्या पालकांनी घेतलेले कष्ट हे सारखेच असल्याचे जाणवते. ते कष्ट खूप प्रामाणिक आणि ध्येयाशी एकरूप असल्यानेच प्रतिष्ठेच्या पदकांची प्राप्ती होऊ शकली, असे मत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि उद्योजक रामदास काकडे यांनी व्यक्त केले.

जागतिक वेटलिफ्टिंग (कनिष्ठ गट) स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने हर्षदा गरुड हिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून हर्षदाच्या पालकांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, हर्षदा गरुड हिचे वडील शरद गरुड, आई रेखा गरुड, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.संभाजी मलघे, उपप्राचार्य अशोक जाधव, फार्मसी महाविद्यालयाचे डॉ. बी. बी. जैन, प्रा. जी. एस. शिंदे आदिंसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

हर्षदा ही इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थीनी असल्याचा अभिमान आहे. या कामगिरीमुळे हर्षदा खऱ्या अर्थाने भारतकन्या म्हणून ओळखली जाईल आणि हाच तिचा योग्य सन्मान असेल, असे काकडे यांनी सांगितले.

यावेळी या यशामागचा हर्षदाचा खडतर प्रवास मांडताना हर्षदाचे वडील शरद गरुड हे भावनिक झाले होते. केवळ पदकाची कमाई करण्यासाठी खेळू नका, तर उत्तम आरोग्यासाठी खेळा, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असेल, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. पालकांनी खेळामध्ये पाल्याचे करिअर घडवताना आर्थिक तडजोडीचा विचार बाजूला ठेवून कष्ट घ्यावेत, असा सल्लाही त्यांनी पालकांना यावेळी दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना पालकांची फसवणूक करू नये. ती आपण आपली स्वतःची फसवणूक करत असतो, हे लक्षात घ्यावे, असे शरद गरुड यांनी सांगितले.

हर्षदाची आई म्हणवून घेताना आज खऱ्या अर्थाने उर भरून आल्याचे हर्षदाची आई रेखा गरुड यांनी सांगितले. हर्षदाचे प्रशिक्षक बिहारीलाल दुबे म्हणाले की, याच इंद्रायणी महाविद्यालयात मीही वेतलिफ्टिंग शिकलो. आज मावळच्या मातीत मुलींनी जितकी चमकदार कामगिरी खेळाच्या क्षेत्रात केली तितकी चांगली कामगिरी मुलांना करता आलेली नाही. ग्रामीण भागातील खेळाडू हेरून त्यांच्यातील गुणांना चालना देऊन त्यांना खेळाच्या योग्य प्रवाहात आणले तर पदकं आपल्यापासून दूर नाहीत, असे दुबे म्हणाले.

संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी महाविद्यालयाच्या उत्तम क्रीडा वारश्याचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी सांगितले, की प्रथम वर्ष कला शाखेत शिकणारी हर्षदा ही अत्यंत हुशार, गुणी व कष्टाळू विद्यार्थिनी असून, तिच्याकडे जिद्द, चिकाटी व प्रचंड मेहनत करण्याची ताकद आहे. त्यामुळे तिने हे सुवर्णपदक पटकावले आहे.

प्रस्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुरेश थरकुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर उपप्राचार्य जाधव यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *