Pimpri News: “सणांतून संस्कृती अन् संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती!”

Pimpri News: “सणांतून संस्कृती अन् संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती!”

Pckhabar- “सणांतून संस्कृती अन् संस्कृतीतून आरोग्यप्राप्ती होते!” असे प्रतिपादन आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रत्नप्रभा चौधरी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे बुधवार, दिनांक ०४ मे २०२२ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित पाच दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘हिंदू सण-संस्कृती व आयुर्वेद’ या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना डॉ. रत्नप्रभा चौधरी बोलत होत्या. उद्योजिका मीनू नायर, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सचिव प्रदीप पाटील, व्याख्यानमाला सहप्रमुख विकास देशपांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मीनू नायर यांनी आपल्या मनोगतातून, “अनेक महापुरुषांनी हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान दिले आहे!” असे मत व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाचे अध्यक्ष धनंजय शेडबाळे यांनी प्रास्ताविकातून तेरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या निसर्गमित्र विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विनीत दाते आणि दीपक नलावडे यांनी पाहुण्यांचा आणि वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. रत्नप्रभा चौधरी पुढे म्हणाल्या की, “संस्कृतीचे आदानप्रदान अन् आनंदाची निर्मिती यासाठी भारतीय सण साजरे केले जातात. शरीर, मन आणि आत्मा यांच्या उन्नतीसाठी सणांचे महत्त्व आहे; कारण सणांच्या माध्यमातून मानवाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास होतो.

सणांमुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. स्वतःची ओळख अन् परमात्म्याशी जोडण्याचे काम सण करीत असतात. आयुर्वेदात ऋषींना ‘आप्त’ म्हणतात; तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना ‘आप्तप्रमाण’ म्हटले जाते. ‘वैविध्यातून एकतेकडे’ हे भारतीय हिंदू संस्कृतीचे ब्रीद आहे. त्यामुळे एकच सण वेगवेगळ्या नावांनी अन् पद्धतींनी देशभरात साजरा केला जातो. हिंदुत्व हे जीवन कसे जगावे हे सांगते; तर हिंदू संस्कृती ही धर्म, ऋतू, निसर्ग यांच्याशी निगडित आहे. त्यामुळे संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला आयुर्वेद ऋतुचर्या, दिनचर्या यांचे पालन करावे, असे सांगतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीत वर्षभर येणारे सण हे मानवी आरोग्याशी सुसंगत आहेत. वातावरणातील बदलांमुळे विविध आजार उद्भवतात. त्यामुळे ऋतुनुसार आपला आहार अन् विहार असला पाहिजे. त्याचप्रमाणे सद्वृत्त अर्थातच चांगले शिष्टाचार कसे असावेत, हेदेखील आयुर्वेदात नमूद केले आहेत.

दोन ऋतूंच्या मधल्या काळाला ‘ऋतुसंधी’ म्हटले जाते. निरामय आरोग्यासाठी ऋतुसंधीच्या काळात उपवास करणे, हे शरीराला लाभदायक असते. दसरा ते दिवाळी या कालखंडाला ‘अश्वयुजमास’ असे म्हटले जाते. या काळातील आहार अन् सणांचे पक्वान्न यांची सांगड आयुर्वेदानुसार घातली आहे. इतकेच नव्हे तर हळदीकुंकू हा समारंभसुद्धा महिलांचे मानसिक अन् सामाजिक अभिसरण करणारा आहे. त्यामुळे संस्कृतीचे हे शाश्वत ज्ञान आचरणात आणून भावी पिढीला संक्रमित केले पाहिजे!”

व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली. श्रीकांत मापारी यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता बाऊसकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *