Pimpri News: पिंपरी चिंचवड महापालिका आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स तर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Pimpri News: पिंपरी चिंचवड महापालिका आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स तर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) यांनी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करुन क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीशील अभिवादन केले आहे असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी हणमंतराव नानवडे यांनी केले.

महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत महानगरपालिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने बेरोजगार युवक युवतींसाठी पिंपरी मोरवाडी येथील महापालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आज रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त वामन नेमाने, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश दामोदर, निवृत्त सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता शरद जाधव, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे निवृत्त अधिक्षक अभियंता अनिल सूर्यवंशी, बानाईचे अध्यक्ष उपअभियंता विजय कांबळे, आयटीआयचे गटनिदेशक विजय आगम, प्रकाश घोडके, ज्योत सोनावणे, निदेशक वृंदावनी बोरसे, उज्वला सातकर, सिमा जाधव, रविंद्र ओव्हाळ, अरुण बांबळे, प्रविण कोळेकर, राजकुमार तिकोणे, विकास क्षीरसागर, शहाजी ताठे, किसन खरात, सुनिल पाटील, अमोल शिंदे, जीवन ढेकळे, संजीव आनंदकर, जयवंत अनपट, भानुदास दुधाळ, सचिन तापकीर, योगिता कोठावदे, प्रकाश शिंदे, निलेश लांडगे आदी उपस्थित होते.

दि. ११ ते १५ एप्रिल दरम्यान कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये झालेल्या या शिबिरामध्ये विविध तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यामध्ये परदेशातील नोकरीच्या संधी आणि शैक्षणिक मार्गदर्शन, महिला कौशल्य विकास उद्योजकता आदी विषयांचा समावेश होता. यामध्ये अनेक इच्छुकांनी यात सहभाग नोंदवत शिबीर यशस्वी केले. आज बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार भरती मेळाव्यामध्ये ३२ पेक्षा अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा, टाटा मोटर्स, फोर्ब्स, टाटा अॅटो कंपोनंट, यझाकी, बीव्हीजी, एलजी, स्टार इंजिनिअर्स, कोकाकोला अशा नामांकित कंपन्यांचा समावेश होता.

रोजगार मेळाव्यासाठी सुमारे दीड हजार पेक्षा जास्त गरजू व्यक्तींनी रोजगारासाठी गुगल लिंकद्वारे नावनोंदणी केली होती. या मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थित झालेल्या या व्यक्तींना रोजगार उपलब्धतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून उपस्थित झालेल्या पाचशे बेरोजगार युवक युवतींपैकी सुमारे चारशे बेरोजगार युवक युवतींना मेळाव्यामध्ये थेट रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. नोंदणी करणा-या उर्वरीत व्यक्तींनादेखील रोजगार देण्यासाठी संबंधित कंपन्यांद्वारे पुढील प्रक्रीयेसाठी पाचारण करण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना नानवडे म्हणाले, कोविड काळानंतर ऑफलाईन झालेला हा मेळावा असून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वातील महत्वाचा कार्यक्रम आहे. कोविड काळात अनेक आस्थापना बंद होत्या. पर्यायाने अनेकांचे रोजगारदेखील बंद झाले. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिकेने रोजगार मेळाव्यासाठी पुढाकार घेतला ही कौतुकाची गोष्ट असून असेच लोकहितकारक आणि लोकाभिमुख उपक्रम महापालिकेने सतत सुरु ठेवावे.

मेळावा उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक मंगेश कलापुरे यांनी केले. मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गटनिदेशक, निदेशक, विद्यार्थी तसेच बानाई संघटनेचे अभियंते आणि प्रतिनिधींनी या मेळाव्याचे संयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *