Pimpri News: आशा स्वयंसेविकांनो काळजी करू नका, तुम्हाला न्याय हक्क मिळवून देणारच – यशवंतभाऊ भोसले

Pckhabar – ”आशा स्वयंसेविकाताईंनो तुम्ही काळजी करू नका, तुमचा हा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला तुमचे न्याय हक्क मिळवून देणारच”, अशी ग्वाही राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणार्या आशा स्वयंसेविकांना दिली.
राष्ट्रीय श्रमिक आघाडी महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने संत तुकारामनगर येथील तुकाराम महाराज पुतळा प्रांगणात नुकतेच आशा स्वयंसेविकांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या वेळी यशवंतभाऊ भोसले बोलत होते. राज्यातील आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर आठ ते दहा तास राबवून घेतले जाते. कोरोना काळात तर या सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद होते. त्यांनी रुग्णसेवा तर केलीच पण कोरोना लसीकरण यशस्वी करण्यात या आशा सेविकांचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार यशवंतभाऊ भोसले यांनी यावेळी काढले.

दरमहा पाच हजार रुपयांच्या मानधनावर तुम्ही उदरनिर्वाह कसा करता याचे आश्चर्य वाटते. सफाई कर्मचारी देखील 18 ते 20 हजार रुपये वेतन घेतो. गरोदर असलेल्या मातेला औषधोपचार, संतुलीत आहाराबद्दलची माहिती देणे तसेच त्या मातेचे नावे रुग्णालयात दाखल करणे अशा जबाबादार्या आशा स्वयंसेविका पार पाडतात. त्याबदल्यात त्यांना तीनशे रुपये दिले जातात व त्यातीलही शंभर रुपये कापून घेतले जातात हे दुर्दैवी असल्याची खंत यशवंतभाऊ भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. तुम्हा सर्व आशा स्वयंसेविकांना तुमचा न्याय हक्क मिळवून देणारच, यासाठी हवी ती लढाई लढण्याची तयारी आहे. मात्र, आशा स्वयंसेविकांनी संघटित राहिले पाहिजे. राष्ट्रीय श्रमिक आघाडी करणार असलेल्या प्रयत्नांना पाठबळ दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आशा स्वयंसेविकांना स्थानिक स्वराज्य संस्थेला लागू असलेले किमान वेतन तसेच इतर सर्व सवलती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर निवृत्तीच्या काळापर्यंत त्यांच्या सेवेला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने त्यांचे हक्क आपण मिळवून देऊ असेही भोसले यांनी सांगितले. यावेळी चाकण येथील उद्योजक पै. जयदेव अक्कलकोटे यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन संतोष टाकळे, कृष्णा शिखरे, आशा आहेर, सुजता गायकवाड, यांनी केले. यावेळी सशांक इनामदार, दिपक पाटील, दिनेश पाटील, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, अकबर चौधरी, करण भालेकर यांनी केले.










Leave a Reply