Pimpri News : इंडिया हॉकीच्या  शिष्टमंडळाने मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयमची केली पाहणी

Pimpri News : इंडिया हॉकीच्या  शिष्टमंडळाने मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयमची केली पाहणी

Pckhabar- भविष्यात पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या हॉकी  स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात इंडिया हॉकीच्या दिल्ली येथील द्विसदस्यीय शिष्टमंडळाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली.

महापालिकेच्या नेहरूनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयमची पाहणी करून तेथील सोयीसुविधांची त्यांनी माहिती घेतली. या शिष्टमंडळामध्ये हॉकी इंडिया चे वरिष्ठ व्यवस्थापक विक्रम सिंग, कार्यालयीन समन्वयक प्रेम किशन यांचा समावेश होता.

पिंपरी चिंचवड शहराला “स्पोर्ट हब” म्हणून विकसित करण्याचे काम सुरु आहे. त्यादृष्टीने महापालिका  विविध खेळांच्या स्पर्धांचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन करत आहे.  हॉकी इंडिया, हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये राष्ट्रीय पातळीवरील हॉकी स्पर्धेचे आयोजन नुकतेच केले होते. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्यामुळे आता ६ राष्ट्रांची संयुक्त हॉकी स्पर्धा घेण्याची संधी महापालिकेला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर हॉकी इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयमला भेट दिली.

यानंतर पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या समवेत ६ राष्ट्रांच्या  संयुक्त हॉकी स्पर्धा आयोजना संदर्भात प्राथमिक चर्चा केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, स्थापत्य क्रीडा विभागाचे सहशहर अभियंता सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, विद्युत विभागाचे सहशहर अभियंता संदेश चव्हाण, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडाधिकारी अनिता केदारी आदी उपस्थित होते.

मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या. प्रेक्षकांची आसन क्षमता वाढवण्यात यावी, मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधा करण्यात यावी, चेंजिंग रूम प्रशस्त करण्यात याव्यात अशा सूचना करण्यात आल्या. तसेच भविष्यात पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या हॉकी  स्पर्धेच्या  प्रसिद्धीबाबत आणि स्पर्धेच्या खर्चाबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *