Dehu News : लाखो वैष्णवांच्या उपस्थितीने इंद्रायणी काठ दुमदुमला

Dehu News : लाखो वैष्णवांच्या उपस्थितीने इंद्रायणी काठ दुमदुमला

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी

Pckhabar- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त राज्य भरातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या उपस्थितीने इंद्रायणी काठ दुमदुमला आहे.
कोरोना च्या महामारीमुळे दोन वर्षे बीज सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला होता. मात्र, यावर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्रीक्षेत्र देहूत दाखल झाले असून या भाविकांच्या उपस्थितीत बीज सोहळा उत्साहात पार पडला.

मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. श्रींची पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली. सकाळी १० वाजता वैकुंठस्थान मंदिराकडे पालखी प्रस्थान झाले. 12 वाजता वैकुंठ सोहळा कीर्तन झाले.

तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूत विविध भागांतून दिंड्या दाखल झाल्या आहेत. इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक, वारकरी आणि दिंड्यांचे आगमन झाले आहे. वारकऱ्यांनी अखंड हरिनाम, कीर्तनासाठी घाटावर, तसेच अनेक ठिकाणी मंडप उभारले आहेत. इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूंनी शेतात, मैदानात दिंड्यांनी मुक्कामासाठी आसरा घेतला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले भजन, हरिपाठ, चिपळ्या, टाळ-मृदंगांच्या गजराने आणि हरिनामाच्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमत आहे. भाविकांसाठी स्वच्छ पाणी, मोफत मास्क वाटप, दर्शनरांगेत भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी छताची सुविधा करण्यात आली आहे. कोरोना संकट पूर्णपणे संपुष्टात आलेले नसल्याने मास्क नसणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेशबंदी आहे. भाविकांनी सामाजिक अंतराचे पालन करावे, गाभाऱ्यात प्रवेश न करता दुरूनच दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *