Pimpri News : ७८ मालमत्ता केल्या ‘सील’, तर ६० मालमत्तांचे तोडले नळ कनेक्शन

Pimpri News : ७८ मालमत्ता केल्या ‘सील’, तर ६० मालमत्तांचे तोडले नळ कनेक्शन

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाने मार्चअखेर कर वसुलीसाठी जोर लावला आहे. जप्ती कारवाईतून १३ कोटी ८१ लाख ५० हजार ५३५ रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. आतापर्यंत ७८ थकबाकीदारांच्या मालमत्ता ‘सील’ केल्या, तर ६० मालमत्तांचे नळकनेक्शन तोडले, अशा १३८ मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात आली.

थकबाकी असलेल्या ४४२ मालमत्तांचे नियोजन केले होते. त्यापैकी ३२९ मालमत्ता जप्त केल्या. त्यातील १९३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

सध्या ५ लाख ६९ हजार ६४५ मालमत्तांची नोंद आहे. चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ४७२ कोटी ३७ लाख मालमत्ता कर वसूल झाला आहे. कर आकारणी विभागामार्फत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडून थकीत कर वसुलीची कारवाई सुरू आहे. कर संकलन विभागाकडून १६ विभागीय कार्यालयांतील वसुली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा दिल्या जात आहेत.

ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केली. अशा मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. थकलेल्या कराचा भरणा न केलेल्या मालमत्ता ‘सील ही केल्या जात आहेत. अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी मालमत्तेच्या थकीत कराचा भरणा करावा. कराचा भरणा करून पाणीपुरवठा खंडित, मालमत्ता सील होणे यासारखी कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन नीलेश देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *