Pune News : बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

Pune News : बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान


Pckhabar- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, बंधुता प्रकाशन या संस्थांचे संस्थापक, साहित्य चळवळीतील अग्रणी बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

सूर्यदत्त शिक्षण संस्थेच्या २४ व्या स्थापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते रोकडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, पदक व स्कार्फ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

बावधन येथील ‘सूर्यदत्त’च्या सभागृहात हा सोहळा पार पडला. भजनसम्राट अनुप जलोटा, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी, ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, मंदाकिनी रोकडे, प्रकाश रोकडे आदी उपस्थित होते. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी या पुरस्काराचा स्वीकार करताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “गेल्या ३५-४० वर्षात बंधुतेच्या विचारांना घेऊन काम करत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली चार तत्वे आपण आयुष्यात जगली, तर आपला समाज सक्षम होईल.”

साहित्याच्या चळवळीतून बंधुतेचा विचार पेरण्यासाठी गेली चार दशके समर्पित भावनेने प्रकाश रोकडे कार्यरत आहेत. रोकडे यांनी २३ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलने, १२ विचारवेध संमेलने, ७ विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलने यशस्वीपणे आयोजित केली आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. ‘मी पाण्याच्या जातीचा’ हे त्यांचे आत्मचरित्र बरेच गाजले. या शिवाय प्रकाशयात्री, बंधुतायन, बंधुतापर्व, आरपार बंधुता, प्रकाशपर्व आणि बंधुतेचा परिसस्पर्श अशा साहित्यकृतीची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव म्हणून ‘सूर्यदत्त’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना आनंद होत असल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *