Dehu Election News : देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण, पूजा दिवटे यांचे अर्ज दाखल
Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण आणि पूजा दिवटे यांचे अर्ज मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्याकडे आज ( सोमवार) सादर करण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच एका उमेदवाराचा अर्ज माघारी घेण्यात येणार असून ही निवडणूक बिनविरोध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण राखीव झाले होते. अनुसूचित जाती या प्रवर्गातून प्रभाग क्रमांक तीन मधून पूजा दिवटे आणि प्रभाग क्रमांक 9 मधून स्मिता चव्हाण या निवडून आल्या आहेत. प्रथम नगराध्यक्ष पद मिळविण्यासाठी दिवटे आणि चव्हाण यांच्यात जोरदार रस्सीखेच निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी सरपंच कांतीलाल काळोखे, मावळ तालुका सरचिटणीस बाळासाहेब काळोखे, सुभाष जाधव, नगरसेवक योगेश परंडवाल, योगेश काळोखे, प्रविण काळोखे, मयूर शिवशरण, माजी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, प्रसिद्ध प्रमुख विशाल परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, देहू ग्रामपंचायतीचे रूपांतर होऊन प्रथमच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, दोन अपक्ष, एक भाजपचा नगरसेवक निवडून आला आहे तर दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचाच नगरसेवक नगराध्यक्ष होणार हे निश्चित होते.
नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नगरसेवकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, आरक्षण अनुसूचित जाती महिले राखीव झाल्याने अनेक नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. आता उपनगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.










Leave a Reply