Pimpri political : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या बंदुकीत भाजपाच्या गोळ्या…मग, युद्ध कसे जिंकणार?

Pimpri political : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या बंदुकीत भाजपाच्या गोळ्या…मग, युद्ध कसे जिंकणार?

Pckhabar- युद्ध जिंकायचे झाल्यास बंदुक आणि त्यातील गोळीही आपलीच असावी लागते. नाहीतर बंदुकीतून निघणारी गोळी फुसबा बार निघणार हे निश्चित… मग, टार्गेट टिपण्याचे सोडा… आपलेच सैन्य घायाळ होण्याची भीती असते. अशीच अवस्था सध्या पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची झाली असल्याचे दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे… लढाई ही स्वत:च्या हिंमतीवर लढायची असते. भाजपामधील आयारामांना सोबत घेवून लढाई जिंकता येणार नाही. किंबहुना, २०१७ मध्ये भाजपाच्या नेत्यांनी जे केले तेच आता २०२२ मध्ये राष्ट्रवादीने केले, तर भरवशाच्या म्हशीला टोणगा…अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सध्या राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. पण, अनेक प्रभागांमध्ये उमेदवार नाहीत. भाजपाने खोगीरभरती केली, तशी राष्ट्रवादीने केली तरफायदा कुणाचा होईल, हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही.
वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अगोदरच सांवळा गोंधळ आहे. सध्यस्थितीला राष्ट्रवादीकडे ३४ ते ३६ नगरसेवक आहेत. त्यापैकी अनेकजण राजकीय निवृत्तीच्या टप्यावर आहेत. निर्णय प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना आपल्या मुलांना राजकारणात आणि सभागृहात पाठवण्याची चिंता आहे. मात्र, भाजपा कसे चुकीचे आहे दाखवण्यासाठी राष्ट्रवादीने केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे.

राष्ट्रवादीची सगळी भिस्त ही भाजपामधून बंडखोरी करणाऱ्यांवर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून भाजपाला खिंडार पडणार, भाजपा फुटणार अशी पेरणी केली जात आहे. वास्तविक, भाजपामध्ये निवडणून न येणाऱ्यांना तिकीटच दिले जाणार नाही. मग, अशी मंडळी राष्ट्रवादीच्या आश्रयाला येणार आहेत. याचा अर्थ भाजपा ज्या उमेदवाराला डावलणार आहे. त्याठिकाणी त्यापेक्षा सरस उमेदवार भाजपाकडे आहे. मग, राष्ट्रवादीत जावून एखाद्या निष्ठावंताचा बळी देवून आणि एक जागा वजा करण्याची निती राष्ट्रवादीला महागात पडेल असा होरा आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रभाग रचना जाहीर झाली. ४६ पैकी १० प्रभागात भाजपा हरकती घेणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच, प्रभाग रचना भाजपासाठी अनुकूल आहेत. पण, १० ठिकाणी प्रभागातील लोकांना अडचण होवू नये आणि समतोल विकास व्हावा. या हेतुने निवडणूक विभागाच्या ही बाब लक्षात आणून देणार आहोत, असा दावा भाजपाने केला आहे. भाजपा नेत्यांच्या मताप्रमाणे, ४६ पैकी १० प्रभाग सोडले, तर ३६ प्रभागांमध्ये १०८ नगरसेवक असणार आहेत. याठिकाणी भाजपा राष्ट्रवादीचा बाजार उठवू शकते. बहुमताचा आकडा पार करण्यासाठी एव्हढे प्रभाग पुरेसे आहेत. दुसरीकडे, भाजपाच्या नेत्यांनी उमेदवारांची नावे निश्चित केली असून, कामाला सुरूवातही केली आहे. याउलट, राष्ट्रवादी अद्यापही चाचपडत आहे.

नगरसेवकांवर कारवाई राष्ट्रवादीच्या अंगलट येणार?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून पिंपरी-चिंचवड भाजपाच्या दोन नगरसेवकांवर पोलीस कारवाई झाली. शहराचे राजकारण गावकी-भावकीच्या मुद्यावर चालते. पक्ष कोणताही असो गाववाला आणि नातेवाईकांचा गोतावळा असल्यामुळे पक्षापेक्षा नात्याला आणि भावकीला महत्त्व जास्त दिले जाते. भाजपा नगरसेवकांवर होणाऱ्या कारवाईचा उत्सव साजरा करीत राष्ट्रवादीचे नेते आता पुढचा नंबर कोणाचा…? अशा बातम्यांची पेरणी करीत आहेत. ही बाब राष्ट्रवादीवर बुमरँग होणार असून, एखादी कारवाई प्रशासकीय आणि उचित असली तरी, त्याचा रोष महाविकास आघाडी आणि बहुदा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर येऊ शकेल असे बोलले जात आहे.

याउलट, २०१७ मध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता होती. त्या काळातही राष्ट्रवादीतील २०-२२ नगरसेवकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. पण, प्रवेशासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पोलीस अथवा प्रशासनाला हाताशी धरुन कुणालाही राजकीय हेतून त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांनी सत्ता मिळवण्यासाठी कुणाच्याही पाठिशी चौकशीचा ससेमिरा लावू दिला नाही. किंबहुना, भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी तसा प्रयत्नही केला नाही.

एकनाथ खडसेंच्या दौऱ्याने काय फरक पडणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराला वैभव प्राप्त करुन दिले. त्यांना २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील स्थानिकांनी सत्तेपासून बाजुला ठेवले, हा इतिहास आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शहराचा दौरा केला. यावर स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोशल मीडियावर आता २० ते २२ नगरसेवक भाजपामधून फुटणार….असा दावा करण्यास सुरूवात केली. गेल्या चार महिन्यांपासून असेच वातावरण करून राष्ट्रवादी एकप्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना नाराज करीत आहे. ज्याठिकाणी अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडकरांनी बाजुला ठेवले. तिथे एकनाथ खडसे काय करणार आहेत? असा साधा प्रश्न राष्ट्रवादीच्या चिंतनात येत नसावा, ही दुर्दैवी गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *