Pimpri Crime News : मॅट्रिमोनियल साइटवरून 255 तरूणीशी संपर्क साधणारे दोन ठग गजाआड

Pimpri Crime News : मॅट्रिमोनियल साइटवरून 255 तरूणीशी संपर्क साधणारे दोन ठग गजाआड

75 लाखांचा ऐवज जप्त

आरोपीनी अडीच ते तीन कोटी रुपये उकळले असण्याची शक्यता

Pckhabar- केंद्र सरकारमध्ये उच्च पदावर असल्याचे भासवून मॅट्रिमोनियल साइटवरून बनावट नावाने तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या दोन भामट्यांना वाकड पोलिसांनी बंगळुरू येथे जेरबंद केले. त्यांच्याकडून ७५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आणि गुरुग्राम येथील तब्बल २५५ तरुणींशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. यापैकी नेमक्या किती तरुणी त्यांच्या आमिषाला बळी पडल्या आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. निशांत रमेशचंद नंदवाना (वय ३३) आणि विशाल हर्षद शर्मा (वय ३३, दोघे रा. मूळ राजस्थान, सध्या – बंगळुरू) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

निशांत हा केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात मुख्य प्रकल्प व्यवस्थापक असल्याची, तर विशाल हा सेंट्रल हौसिंग अॅण्ड अर्बन ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री खात्याचा उपसंचालक असल्याची बतावणी करत असे. दोघांनी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तरुणींसमवेत जीवनसाथी या मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख केली. निशांतने आपले नाव अधितांश अग्निहोत्री, तर विशालने अश्विक शुक्ला हे बनावट नाव वापरले. निशांतने तरुणीकडून एका प्रोजेक्टसाठी १३ लाख रुपये घेतले, तर विशालने व्यवसायासाठी तरुणीकडून पाच लाख रुपये घेतले, तसेच जीपमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघेही मोबाईल बंद करून पुण्यातून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे दोन्ही तरुणींच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

दोघे आरोपी बंगळुरू येथेही उच्चभ्रू वसाहतीत दुसऱ्याच बनावट नावाने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार दोघांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून १३ महागडे मोबाईल, बनावट ओळखपत्रे, दोन मोटारी, रोकड असा ७५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दोघांनी पुण्यातील ९१, बंगळूरू येथील १४२ आणि गुरुग्राम येथील २२ अशा तब्बल २५५ तरुणींशी मॅट्रिमोनियल साइटवरून संपर्क साधल्याचे समोर आले आहे. आरोपींवर गुरुग्राम येथे दोन, बंगळुरू येथे तीन आणि पुण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्यांनी आतापर्यंत या माध्यमातून अडीच ते तीन कोटी रुपये उकळले असण्याची शक्यता कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केली. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, संतोष पाटील, रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, अभिजित जाधव, बालाजी ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *