Bhosari News : भोसरी परिसरातील विद्युत रोहित्रांना संरक्षक कवच बसवा : नगरसेविका नम्रता लोंढे

Bhosari News : भोसरी परिसरातील विद्युत रोहित्रांना संरक्षक कवच बसवा : नगरसेविका नम्रता लोंढे

महावितरणचे कार्यकारी अभियंता उदयचंद्र भोसले यांना निवेदन

Pckhabar-भोसरी येथील शांतीनगर परिसरात असलेल्या विद्युत रोहित्राने पेट घेतला. त्याच्या ज्वाळा उंचीपर्यंत गेल्या. सुदैवाने रोहित्राचा स्फोट अथवा त्यातील तप्त तेल बाहेर पडले नाही, त्यामुळे जीवित हानीचा धोका टळला. या जीवित हानी टळली असली तरी अशा काही घटनांमध्ये नागरिकांचा जीव गेला आहे. त्यामुळे विद्युत रोहित्रांना संरक्षक कवच बसवावे, अशी मागणी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी केली आहे.

याबाबत महावितरण भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता उदयचंद्र  भोसले यांना निवेदन दिले.

चिंचवड येथे रोहित्राचा स्फोट होऊन एका अपंग नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर इंद्रायणीनगर भोसरी येथील विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. चिंचवड येथे आणखी एक रोहित्राने पेट घेतल्याची घटना घडली. शांतीनगर भोसरी येथे एका रोहित्राला आग लागली. अशा रोहित्र पेट घेण्याच्या, त्याच्या स्फोट होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

रोहित्राने पेट घेतल्यास, त्याचा स्फोट झाल्यास त्यातील तप्त तेल दूरपर्यंत उडते. ते नागरिकांच्या अंगावर पडल्यास मोठी दुर्घटना होते. रोहित्रांना पत्र्याचे संरक्षक कवच असल्यास तेल उडाले तरी ते पसरणार नाही. तसेच रोहित्रांच्या खाली अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्या गवतावर रोहित्रातून उडणारी विद्युत ठिणगी पडल्यास ते गवत पेट घेतले. रोहित्र पेट घेण्यास अनेकदा हे गवत कारणीभूत ठरते. त्यामुळे ते गवत देखील वेळच्या वेळी काढणे आवश्यक आहे.

महावितरणच्या भोसरी विभागात सुमारे सव्वातीन हजार विद्युत रोहित्र आहेत. भोसरी परिसरातील अनेक रोहित्रांना पत्र्याचे संरक्षक कवच नाही. त्यामुळे दुर्घटना घडल्यास अनेकदा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. विद्युत रोहित्रांना पत्र्याचे संरक्षक कवच बसवावे. रोहित्राच्या परिसरातील गवत, कचरा काढावा, रोहित्राच्या परिसरात गवत वाढणार नाही, याबाबत ठोस उपाययोजना करावी. विद्युत रोहित्रांची वेळोवेळी तपासणी करून रोहित्रांवरील अधिकचा भार कमी करावा, अशीही मागणी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *