Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणार 4292 पदांची भरती

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणार 4292 पदांची भरती
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत तब्बल चार हजार 292 पदांची भरती करण्यात येणार आहे. महापालिका ही भरती प्रक्रिया स्वतःच राबविणार आहे.

महापालिका आस्थापनेवरील नोकरभरती करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. 14 डिसेंबरला महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च 35 टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना नगर विकास विभागाने महापालिकेस दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच नोकरभरती केली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे.

अत्यावश्यक असलेली पदे प्राधान्याने भरली जाणार आहे. त्यात वैद्यकीय, आरोग्य, विद्युत पाणीपुरवठा या अत्यावश्यक विभागाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात कारकुन, प्रशासन अधिकारी अभियंता आणि इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. खासगी संस्थेच्या माध्यमातून भरती करत असताना अनेक गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे महापालिकेने भरती प्रक्रिया स्वतःच राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापालिकेचे प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.

महापालिकेची निवडणूक मुदतीमध्ये झाल्यास या महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता लागू होऊ शकते. आगामी निवडणूक आणि आचारसंहिता लक्षात घेता महापालिका आता नोकरी भरती राबविणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *