Sangvi news: प्रतिभा महिला प्रतिष्ठानतर्फे परिचारिकांचा गौरव

Sangvi news: प्रतिभा महिला प्रतिष्ठानतर्फे परिचारिकांचा गौरव
Pckhabar- जागतिक परिचारिका दिनानिमित्त चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा महिला प्रतिष्ठानतर्फे कोरोनाच्या या संकटामध्ये रुग्णांची सुश्रुषा करीत असलेल्या परिचारिकांचा गौरव करण्यात आला. परिचारिकांना साडी भेट देण्यात आली. पौष्टिक लाडू देण्यात आले. त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवीतील इंदिरा गांधी रुग्णालयात जैव विविधता समितीच्या सभापती उषा मुंडे यांच्या हस्ते परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्वीय सहाय्यक सतिश कांबळे, डॉ. दिनेश दळवी, परिचारिका स्नेहल करमळकर, अंजली नेवसे, सुवर्णा साठे, आशा वरुडकर, रुपाली घुले आदी उपस्थित होते.

आज 12 मे जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. रुग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या आणि या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या थोर परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.

जैव विविधता समितीच्या सभापती उषा मुंडे म्हणाल्या, “गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या महामारीत परिचारिका आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची अहोरात्र सेवा करत रुग्णाला सकारात्मकता ऊर्जा प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य अविरतपणे परिचारिका करत आहात. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कुटुंबाची, मुलाबाळांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र झटून आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत आहेत. अनेक रुग्णालयातील परिचारिका भगिनी तर गेले कित्येक दिवस आपल्या घरीदेखील गेलेल्या नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही. परिचारिकांच्या कार्याला मी सलाम करते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *