Pimpri news: … तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, स्पर्शवर कारवाई करा; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Pckhabar- मोफत बेडसाठी पैसे घेणे, रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करणे आदी गंभीर बाबी ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श संस्थेच्या उघडकीस येत आहेत. त्यामुळे नागरिकामध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे त्वरित स्पर्श संस्थेवर कारवाई करा, अशा सुचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिकेला पत्र पाठवून केल्या आहेत.
याबाबत आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना लेखी पत्र पाठविले आहे.
स्पर्श संस्था चालवित असलेल्या
ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये गरजू रुग्णांकडून बेड आणि इतर वैद्यकीय सेवा मिळवून देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याच प्रमाणे आणखी अनेक रुग्णांची फसवणूक व पिळवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्पर्श या संस्थेने गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार केल्याचे दिसून आल्याने या संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी. जनतेची अशीच पिळवणूक होत राहिली तर जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे.
पोलीस आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्पर्श प्रायव्हेट लिमीटेडचे कन्सलटंट म्हणून डॉ. प्रविण जाधव कार्यरत आहेत. वरिल नमूद आरोपी यांनी त्याच्या गुन्हयामधील सह आरोपी डॉ. सचिन श्रीरंग कसबे आणि डॉ. शशांक भरत राळे, पद्मजा हॉस्पीटल, वाल्हेकरवाडी, चिंचवड, यांच्याशी संगनमत करुन महानगरपालिकेच्या कोवीड हॉस्पीटलमध्ये बेड उपलब्ध करणे व इतर वैद्यकीय सेवा मिळवून देण्याच्या नावाखाली गरजू रुग्णांकडून मोठया प्रमाणात पैसे घेण्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. तसेच आणखीन काही रूग्णांची फसवणूक व पिळवणुक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी करोना साथीचे दरम्यान स्पर्श प्रायव्हेट लिमीटेडद्वारे भोसरी येथे रामस्मृती मंगल कार्यालय व हिरा लॉन्स या दोन ठिकाणी कोवीड केअर सेंटर चालविले जात होते. सदर ठिकाणी रूग्णांवर उपचार न करताच पाच कोटी 26 लाख रुपयांचे खोटे बिल सादर केल्याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयएएस दर्जाचे अधिकाऱ्यांचे मार्फत चौकशी सुरू आहे. ऑटो क्लस्टर पिंपरी येथील हॉस्पीटलचे व्यवस्थापन देखील स्पर्श संस्थाच करत आहे.
सध्याच्या दाखल गुन्ह्या संबंधीत उघडकीस आलेला भ्रष्टाचार व गैरव्यवहार लक्षात घेता या महामारीच्या काळामध्ये लोकांची अशीच पिळवणुक होत राहिली तर भविष्यात जनतेमध्ये असंतोष निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी ऑटो क्लस्टर येथे कोव्हिड हॉस्पीटल चालविणाऱ्या स्पर्श प्रायव्हेट लिमीटेड संस्थेवर योग्य ती कार्यवाही होणेस विनंती आहे.










Leave a Reply