Pimpri news: कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना ‘म्युकोरमायकोसिस’ चा धोका !

Pimpri news: कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना ‘म्युकोरमायकोसिस’ धोका !
Pckhabar- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांना रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेमुळे मधुमेही रुग्णांना म्युकोरमायकोसिस या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. वरच्या जबड्यात आणि वरच्या जबड्याच्या वर असलेल्या हाडांच्या पोकळीत म्हणजे सायनसमध्ये काळसर अशी बुरशी तयार होऊन प्रसंगी अशा रुग्णांवर जबड्याच्या व जबड्याच्या वरील सायनस च्या शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत.

कोविडच्या दुसर्‍या लाटेनंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयातील कान, नाक,घसा विभाग आणि दंतरोग विभागांमध्ये अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. अशी माहिती  दंतरोग विभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे आणि कान नाक घसा विभागप्रमुख डॉ अनिकेत लाठी यांनी दिली.  या आजारावरील शस्त्रक्रिया  वाय सी एम रुग्णालयात डॉ अनिकेत लाठी, डॉ आदित्य येवलेकर,  डॉ.कौस्तुभ कहाणे, डॉ यशवंत इंगळे यांच्या सहकार्याने करण्यात आल्या.
म्युकोरमायकोसिस या आजारामध्ये काळसर अशा बुरशीचा संसर्ग वाढून प्रसंगी डोळ्यार्यंत आणि मेंदूपर्यंत प्रादुर्भाव होऊ शकतो. हवेतून प्रसार होणारे स्पोअर्स हे नाका तोंडातून शरीरात प्रवेश करतात.  रुग्णाची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असेल आणि  मधुमेही रुग्णाचे रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंत्रित असेल अशा रुग्णास कोविड उपचारा दरम्यान अतिप्रमाणात स्टिरॉइड आणि वायरल लोड, सायटोकाइन स्टॉर्म कमी करण्यासाठी   रेमडेसीविर  आणि सारखे इंजेक्शन द्यावे लागते. यामुळे सिरम आयर्नचा लोड वाढतो.

वायसीएम रूग्णालयाचे दंतरोग विभाग प्रमुख डॉ.यशवंत इंगळे म्हणाले,
म्युकोरमायकोसिस ही बुरशी पर्यावरणात नैसर्गिक रित्या अस्तित्वात असते. परंतु प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर या प्रकारच्या बुरशीचा शरीरामध्ये संसर्ग होतो. श्वासोच्छ्वासावाटे या बुरशीचे कण शरीरात गेल्यानंतर फुप्फुस तसेच वरच्या जबड्यातील सायनस मध्ये आणि वरच्या जबड्यामध्ये दुष्परिणाम होतो.

कोरोनपश्चात मुकोरमायकोसिस आजाराची लक्षणे:

1)तीव्र डोकेदुःखी, अंगात सतत बारीक ताप असणे
2)गालावर सूज किंवा बधिरपणा येणे
3)नाक गळणे
4)वाचा जबड्यातील हिरड्यांवर पू  असलेल्या पुळ्या येणे
5)वरच्या जबड्यातील दातांचे हलणे
6)जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणे.
7)वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे.

आजार टाळण्याचे उपाय:

1)तोंडामध्ये आणि नाकातील पोकळ्याना सौम्य निर्जंतुकीकरण द्रावणाने धुणे किंवा  वॉश देणे.
2)मधुमेही रुग्णांना उपचारादरम्यान स्टिरॉइड व इतरइंजेक्शनचा नियंत्रित वापर करणे.
3) रोगप्रतिकारशक्ती वर्धक बाबींचा आहारामध्ये समावेश करणे.
4)लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि उपचार करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *