Pimpri news: पारनेरचे आमदार लंके यांनी उभारले 1100 बेडचे कोविड सेंटर; पिंपरीतील लोकप्रतिनिधी कागदी घोडे नाचवण्यात दंग

Pimpri news: पारनेरचे आमदार लंके यांनी उभारले 1100 बेडचे कोविड सेंटर; पिंपरीतील लोकप्रतिनिधी कागदी घोडे नाचवण्यात दंग
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात रोज तीन हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना बाधित सापडत आहेत. प्रत्येक दिवशी 50 पेक्षा अधिक रुग्णांचे बळी जात आहेत. शहरातील महापालिका व खाजगी रुग्णालय हाऊसफुल आहेत. कोविड रुग्ण व त्यांचे नातेवाईक ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेमडिसीवर इंजेक्शन साठी खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवक यांच्याकडे मदत मागत आहेत. मात्र आमदार, खासदार,पदाधिकारी, नगरसेवक वेगवेगळी पत्रकबाजी करून  मागण्या करताना दिसतात. ही वेळ कागदी घोडे नाचवण्याची नसून प्रत्यक्ष कृती करण्याची आहे, असा टोला माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी  लोकप्रतिनिधींना हाणला आहे. तसेच पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचा आदर्श घेऊन कोविड सेंटर उभारावेत, अशी मागणी केली आहे.

रुग्ण संख्या प्रचंड वाढत  असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. पिंपरी चिंचवड  शहरातील बहुतांशी लोकप्रतिनिधी बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून यांच्या पाचशे, हजार फ्लॅटच्या स्कीम शहरात सुरू आहेत. बहुसंख्य लोकप्रतिनिधींची मंगल कार्यालय आहेत.  स्वत: च्या स्कीममध्ये अथवा मंगल कार्यालयात स्वखर्चाने कोविड सेंटर सुरू करू इच्छितो त्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी. असा पुढाकार घेताना एकही लोकप्रतिनिधी  दिसत नाही. पिंपरी-चिंचवडकर रामभरोसे आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.

एका सामान्य कुटुंबातील पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अकराशे बेडचे कोविड सेंटर उभे केले आहे. मग  पिंपरी चिंचवड शहरातील  खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी, अनेक नगरसेवक यांच्याकडे  आमदार लंके यांच्या पेक्षा कितीतरी मोठी क्षमता आहे. तरी ते काही का करत नाहीत? असा सवाल भापकर यांनी उपस्थित केला आहे.

मी शहरातील क्षमता असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की आपण स्वयंस्फूर्तीने आमदार निलेश लंके यांच्या प्रमाणे आयसीयू, ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त छोटी-मोठी सेंटर  सुरू करावीत व यासाठी लागणारी यंत्रसामग्री औषधे इंजेक्शने व प्रशिक्षित मनुष्यबळ याची तयारी करून या आणीबाणीच्या काळात पिंपरी चिंचवडकरांचे जीव वाचण्यासाठी ठोस कृती करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *