Pimpri news:…ही वाहतूक कोंडी नसून अंत्यविधी करण्यासाठी ॲम्ब्युलन्सची रांग!

Pimpri news:…ही वाहतूक कोंडी नसून अंत्यविधी करण्यासाठी ॲम्ब्युलन्सची रांग!
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून अनेक रुग्णांना बेडही मिळत नाहीत. शहरात मृत्यूचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एकाच दिवशी 40- 50 जणांचे मृत्यू होत आहेत. काल गुरुवारी 61 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून निगडी स्मशान भूमीतील विद्युत दाहिण्या न थांबता सतत कार्यरत आहेत. शहराबाहेरील व्यक्तीच्या मृतदेहांचा अतिरिक्त ताणही शहरातील विद्युत दाहिणींवर पडत आहे. त्यामुळे विद्युतदाहिन्या थकत असून
मध्येच बंद पडत आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहाला प्रतीक्षा करावी लागत असून स्मशान भूमीत ॲम्ब्युलन्सची अक्षरशा : रांग लागत आहे.

महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. दररोज हजारो रुग्ण सापडत आहेत. आपल्या जवळच्या व्यक्तींना वाचविण्यासाठी नातेवाईक तहान भुक विसरून धावाधाव करत आहेत.
रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. रुग्णालयाबाहेर मिळेल त्या ठिकाणी रुग्ण तात्पुरता इलाज होईल या आशेने पडून आहेत. रुग्णालयात डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. अशा कठीण काळात आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर व रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. पिंपरी महापालिकेची सर्वच कोविड सेंटर रुग्णांनी तुडुंब भरली आहेत. अनेक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत आहेत. दररोज मृतांचा आकडा वाढत आहे.

शहरातील प्रमुख स्मशान भूमीवर मोठा ताण वाढला आहे. निगडी, भोसरी आणि पिंपरी या तीन ठिकाणी प्रमुख दाहिण्या 24 तास सुरू आहेत. निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत दोन विद्युत दाहिण्या कार्यरत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून निगडी स्मशान भूमीतील विद्युत दाहिण्या न थांबता सतत कार्यरत आहेत. गेल्या 15 दिवसात 300 पेक्षा जास्त मृतदेह अंत्यविधीसाठी दाखल झाले. दिवस – रात्र मृतदेह जाळल्यामुळे धुरांडे दम टाकत आहेत.

अशा कठीण काळात परगावाहून अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना स्मशान भूमीत मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे कार्यकर्ते संतोष चव्हाण, तेजस सापरिया, विजय मुनोत व समिती अध्यक्ष विजय पाटील मात्र तत्परता दाखवत माणुसकी जपत आहेत.त्यांना धीर देऊन अंत्यविधीसाठी मदत करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *