Bhosrai news: कोरोना चाचणी तपासणी केंद्रामध्ये वाढ करा; ई प्रभाग समिती अध्यक्ष विकास डोळस यांची आयुक्तांना सूचना
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून बाधितरुग्णाच्या संपर्कातील नागरिकालाही चाचणी करावी लागते. त्यामुळे चाचणी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, चाचणी केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे अनेक नागरिकांना कडक उन्हात थांबावे लागते. बसायला जागा नाही. एखाद्याला कोरोना नसला तरी गर्दीतून होण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोना चाचणी तपासणी केंद्रामध्ये वाढ करावी, अशी सूचना ‘ई’ प्रभाग समितीचे अध्यक्ष विकास डोळस यांनी आयुक्तांना केली आहे.
विकास डोळस म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच ते सात जणांची तपासणी केली जात आहे. दिवसाला पाच हजारहून अधिक चाचण्या केल्या जातात. भोसरीत अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि भोसरीत अशा दोनच ठिकाणी कोरोना चाचणी तपासणी केंद्र आहे. आज दुपारी अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथील चाचणी केंद्राची पाहणी केली असता 300 ते 350 नागरिक चाचणीसाठी रांगेत थांबले होते.
कडक उन्हात नागरिक थांबले होते. सावलीची कोणतेही व्यवस्था नाही. बसायलाही जागा नाही. नागरिकांची संख्या मोठी असल्याने तपासणी करण्यासाठी आलेल्या एखाद्याला कोरोना नसला तरी गर्दीतून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी महापालिकेने चाचणी केंद्रामध्ये वाढ करावी. केंद्राच्या ठिकाणी सावलीची व्यवस्था करावी. नागरिकांना बसण्याची सुविधा निर्माण करावी. चाचणी केंद्रामध्ये वाढ करावी अशी सूचना अध्यक्ष डोळस यांनी आयुक्तांना दूरध्वनीद्वारे केली. त्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी केंद्राच्या ठिकाणी सावलीची, बसण्याची व्यवस्था केली जाईल. चाचणी केंद्रामध्येही वाढ करण्याची ग्वाही डोळस यांना दिली.










Leave a Reply