Mumbai news: शालेय शिक्षण विभागाची दिरंगाई; शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार रखडले

Mumbai news: शालेय शिक्षण विभागाची दिरंगाई; शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार रखडले
Pckhabar-मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार अद्याप झालेले नाहीत. फेब्रुवारी पेड इन मार्चचे पगार तब्बल एक महिन्याने मिळाले. तर मार्च पेड इन एप्रिलचे पगार दुसरा आठवडा उजाडला तरी शिक्षकांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. शालेय शिक्षण विभागातील दिरंगाईमुळेच हे घडत असल्याचे वित्त विभागाकडून सांगण्यात येत असून याप्रकरणा आता शिक्षक भारतीच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना याप्रकरणी पत्र पाठवले आहे. शिक्षण विभागाचे सचिवालय राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या पगाराबाबतीत गंभीर नसल्यामुळेच दर महिन्याला पगार उशिरा होत आहेत, असा आरोप आमदार कपिल पाटील यांनी या पत्रात केला आहे.

राज्य सरकारकडून कोविड निधी वितरण दर महिन्याला मागणीनुसार होत आहे. शिक्षकांच्या पगाराची सर्व रक्कम शिक्षण खात्याने वेळीच मागितली पाहिजे. मात्र शिक्षण विभागाकडून असे होताना दिसत नाही. परिणामी त्याचा भुर्दड शिक्षकांना सहन करावा लागतो, असे शिक्षणमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी स्पष्ट केले आहे. पगार उशिरा झाल्यामुळे गृहकर्जाचे हप्ते, इतर हप्ते आणि दैनंदिन खर्च भागवणे मुश्किल होते. तसेच हप्ते चुकल्यामुळे दंड सहन करावा लागतो, असेही मोरे यांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *