Pimpri news: जुळ्या मुलींना जन्म देताच आईने सोडले प्राण…
Pckhabar-जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या कोरोना बाधित आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात मंगळवारी घडली. आईचा चेहरा बघण्यापुर्वीच दोन चिमुकल्या आईविना पोरक्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात पिंपरीगावातील 36 वर्षीय गरोदर महिलेला रविवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, रूग्णालयात दाखल करतानाच त्यांची ऑक्सिजन लेव्हल खालावली होती. महिलेची प्रसूतीची वेळ जवळ आली होती. महिलेला रूग्णालयात भरती केल्यानंतर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. सोमवारी सिझेरियन करून त्यांची प्रसूती करण्यात आली. त्यांनी जुळ्या गोंडस मुलींना जन्म दिला. मात्र, त्यानंतर आईची प्रकृती खालावत गेली आणि आज मंगळवार सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलींना जन्म दिल्यानंतर चोवीस तासाच्या आतच चिमुकल्यांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपलं. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाती आहे.
दरम्यान, दोन्ही जुळ्या मुलींची अॅन्टीजेन चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
गरोदर महिलांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन वायसीएममधील डॉक्टरांनी केले आहे.










Leave a Reply