
Pckhabar- श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा मंगळवारी मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. हरिनामाच्या गजरात सर्व वारकर्यांनी तुकोबांना कोरोना महामारीतून जगाला मुक्त करण्याचे साकडे घालून वारी पुन्हा पूर्ववत सुरु व्हावी, अशी मागणी केली. कोरोनाचे सावट असतानाही वारकर्यांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. मात्र, देहूनगरीत शुकशुकाट होता.

पुणे जिल्ह्यात कोरोना संकटाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्याबाबत जिल्हाधिकार्यांनी आदेश दिले होते. या आदेशाचा मान ठेऊन वारकर्यांनी बीज सोहळा घरूनच साजरा केला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत देहूत दिंडी काढण्यात आली. त्यात देहू मधले स्थानिक लोक सहभागी झाले होते. दरवर्षी यासाठी वारकरी देहुत हजेरी लावत असतात. यंदा मात्र कोरोनामुळे त्यांना बंदी करण्यात आली होती. त्यामुळे वारकरी नाराज होते. मात्र 50 लोकांसह दिंडी काढत ती देऊळ वाड्यात नेण्यात आली.

तसेस यापुढील वार्यांसाठी शासनाने वारकर्यांना परवानगी द्यावी. कोरोना साथ असेल तर त्याबाबत काही नियम घालून द्यावेत, अशी मागणी वारकर्यांनी शासनाकडे केली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तुकाराम बीजेच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील सुमारे 200 वारकर्यांनी देहूगावच्या वेशीवर विठूनामाचा गरज करत अनोखे आंदोलन केले होते.

बीज सोहळ्यासाठी देहूनगरीत दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, आठ पोलीस निरीक्षक, 100 पोलीस आणि राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.










Leave a Reply