Pimpri news: श्री संत तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक विद्यापीठ – महापौर

Pimpri news: श्री संत तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक विद्यापीठ – महापौर
Pckhabar-श्री संत तुकाराम महाराज म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक विद्यापीठ असून त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे.  समाजातील अनागोंदी, भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्यासाठी तसेच समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून सजग समाज निर्मितीसाठी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांनी दिलेली शिकवण आजही समाजाला मार्गदर्शक आणि मानवी जीवनाला उपकारक ठरत आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजनिमित्त संत तुकारामनगर पिंपरी येथील त्यांच्या पुतळयास तसेच निगडी येथील संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज भक्ती शक्ती समूह शिल्पास  महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
महापौर ढोरे म्हणाल्या,  संत तुकाराम महाराजांनी समाजामध्ये पसरलेली धर्म-कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली.   त्यांची अभंगवाणी महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये आजही वसली आहे.  या अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम महाराजांनी दिली.  सामाजिक परिवर्तनासाठी जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली.  गुलामगिरीची चौकट मोडून समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला.  संघर्षमय जीवन जगुनही अध्यात्म, भागवत भक्ती, उपदेशाची कास न सोडणार्‍या संत तुकोबारायांचे विचार सदैव प्रेरक राहतील असे महापौर ढोरे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *